जामखेड न्युज – – – –
मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार मद्यावरील कर मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा विचार करत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मद्यांच्या किंमती स्वस्त होणार आहे. माहितीनुसार मध्यप्रदेशात येत्या आर्थिक वर्षात राज्य मंत्री परिषदेने नवीन एक्साइज पॉलिसी 2022-23 आणि हेरिटेज वाइन पॉलिसी 2022 ला मंजूरी दिली आहे. या नवीन धोरणामुळे विदेशी मद्यावरील कर कमी होऊन राज्यात मद्याची किंमत स्वस्त होणार आहे.
ADVERTISEMENT 

एवढंच नव्हे तर या धोरणाअंतर्गत एक कोटीहून अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना घरातच बार सुरू करण्याची सूटही देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत नवीन मद्य धोरणाला मंजूरी देण्यात आली. या नवीन धोरणामुळे अवैध मद्य निर्मिती, परिवहन, साठा आणि विक्रीवर नियंत्रण आणता येईल असा दावा सरकारने केला आहे.
मध्यप्रदेश सरकारच्या या नवीन धोरणानुसार अवैध पद्धतीने विकल्या जाणाऱ्या मद्यावरील कर कमी करून नियमित व्यवहारात आणले जाईल. त्यामुळे मद्याच्या किंमती कमी होतील. याशिवाय सरकारने महुआच्या फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या गावठी मद्यालाही प्रायोगिक तत्वावर मंजूरी दिली असल्याची माहिती आहे.
दरम्यान, नवीन धोरणानुसार मध्यप्रदेशातील सर्व मोठ्या विमानतळांवर मद्य विक्रीचे स्टॉल असणार आहे. त्यासाठी निश्चित परवाना शुल्कावर वाईन विक्री करण्याची परवानगी स्टॉलधारकांना देण्यात येणार आहे.