चिंता वाढली! नगर जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्येत दररोजच वाढता आलेख

0
204
जामखेड न्युज – – – 
दुसऱ्या लाटेच्या वेळी राज्यासाठी चिंतेचा विषय ठरलेल्या नगर जिल्ह्यात आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येसह उपचाराधीन रुग्णसंख्याही सतत वाढत आहे. आज दैनंदिन रुग्णसंख्या २२५ तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ७५० च्या वर पोहोचली आहे.
   
गेला महिनाभर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या स्थिर होती. दैनंदिन रुग्ण ४० ते ७० च्या आसपास तर उपचाराधीन रुग्ण ३०० च्या आसपास होते. दोन-तीन दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज नव्या २२५ रुग्णांची भर पडली. आठवड्याच्या आतच रुग्णसंख्या दुप्पट झाल्याचे पाहायला मिळते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्क्यांवर आले आहे. सुदैवाने मृत्यूंचे प्रमाण अद्याप कमी आहे. रुग्णवाढीचे प्रमाण नगर शहरात जास्त आहे.
                      ADVERTISEMENT
 
दुसऱ्या लाटेत राज्यातील रुग्ण संख्या ओसरली तरीही नगरमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर रुग्णसंख्या घटल्याने आणि बराच काळ स्थिर राहिल्याने दिलासा मिळाला होता. राज्यभर ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असली तरी नगर जिल्ह्यात आतापर्यंच केवळ एकच रुग्ण आढळून आला. तोही आता ठणठणीत बरा होऊन घरी गेला आहे. त्यानंतर पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात करोनाचा शिरकाव झाला. तेथे तब्बल ८२ विद्यार्थी करोना बाधित आढळले. आता तेही बरे झाले आहेत.
मात्र, जिल्ह्यात विशेषत: नगर शहरात नव्याने बाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत नगर जिल्हा तुलनेत पिछाडीवर आहे. त्यामुळे आता त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ज्या भागात लसीकरणाची गती संथ आहे आणि करोनाचे आकडे वाढत आहेत, तिथे येत्या दहा दिवसांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकरी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. सोबतच संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि प्रशाकीय अधिकारीही सरसावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here