जामखेड न्युज – – – –
हिवाळी अधिवेशन (Winter Session) संपल्यानतंर पाच दिवसांच्या कामकाजाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे का उपस्थित राहू शकले नाहीत याचीही माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन यावेत, ही सगळ्यांची अपेक्षा होती. ते येणार असल्याचेही मीही सांगितले होते. त्यानुसार शेवटच्या दिवशी ते येणार होते. परंतु, कोरोना वाढत असल्याने त्यांची प्रकृती चांगली राहणे गरजेचे असल्याने त्यांना विनंती करून सभागृहात येऊ दिले नाही. अधिवेशनाच्या काळात झालेल्या दोन बैठकांना मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री उपस्थित नसल्यानं विरोधकांनी खोचक टीका करताना अनेक सल्ले दिले होते. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पदभार आदित्य किंवा रश्मी वहिनींकडे द्यावा असंही म्हटलं होतं. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावं असं म्हटलं होतं. मुख्यमंत्रीपदाच्या चार्जवरून झालेल्या टीकेलाही अजित पवार यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्यानी त्यात नाक खुपसायची काही गरज नाही.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होणार का याची चर्चा सुरु आहे. यावरही अजित पवार यांनी काही संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटलं की, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लोकांनी काळजी न घेतल्यास पुढच्या दीड-दोन महिन्यांत संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या-त्या वेळी रुग्णसंख्येचा आकडा पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री घेतील.
अर्थसंकल्पी अधिवेशन नागपूरमध्येराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २८ फेब्रुवारीपासून नागपुरात होणार आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत झाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र, पुढचे अधिवेशन नागपुरात घेण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती.