जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील घाटमाथ्यावरील साकत, दिघोळ, माळेवाडी, जातेगाव या गावांसह शेजारच्या गावात रानडुक्करांनी थैमान घातले आहे. पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करत आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत वनविभागाने तातडीने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
जामखेड तालुक्यातील साकत, दिघोळ- माळेवाडी परिसरात रानडुकरांचा सुळसुळाट झाला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे केले नाही तर दिघोळ व माळेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह जामखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सरपंच नानासाहेब गिते यांनी दिला आहे.
दिघोळ माळेवाडी या परीसरातील शेतकऱ्यांच्या कांदा , ज्वारी, मका, तुर, ऊस, असे विविध पिके रानडुक्करांकडून उध्वस्त केली जात आहेत. पिके जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकरी आज संकटात सापडला आहे. या बाबीचा विचार करून दिघोळचे सरपंच नानासाहेब गिते यांनी आ. रोहित पवार व जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे व वनविभागाचे अधिकारी यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
शासनाने वनविभागामार्फत या रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे आणि झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच नानासाहेब गिते यांनी केले आहे





