जामखेड प्रतिनिधी
नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालावरून माजी मंत्री प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी आमच्याच ताब्यात जास्त ग्रामपंचायती असा दावा प्रतिदावा केल्याने राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. आमदार रोहित पवार म्हणाले मी सामाजिक गुंड आहे तर माजी मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले मी विकासाचा दहशतवादी आहे.
‘आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावी आणि दादागिरीची भाषा करीत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की माझ्यासारखा ‘सामाजिक गुंड’ कोणी नाही,’ असा इशारा कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिला होता. त्याला प्रा. शिंदे यांनी चौंडी येथे पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला 

गेल्या पाच वर्षांत आपण या मतदारसंघात विकासाची दहशत निर्माण केली आहे. त्याची राज्यभर चर्चा आहे. जे कोणी स्वत:ला सामाजिक गुंड म्हणवून घेत असतील त्यांनी त्याचे विश्लेषण करावे. मात्र दबाव आणि दडपशाहीचे राजकारण फार काळ टिकत नाही, असा टोलाच शिंदे यांनी लगावला आहे. वर्षभरात जामखेड तालुक्यात कसलाही विकास झाला नाही फक्त भुलभुलैय्या आहे. थोडे फार विंचरणा नदीच्या खोलीकरणाचे काम झाले आहे पण त्यासाठी मशीन व डिझेल बारामतीहून आणले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत रस्त्यावरील भिंती रंगवण्याचे काम सुरू आहे त्यासाठी कलर बारामती हून आणला आहे व बारामतीच्या व्यक्तीला त्याचा ठेका दिला आहे. कोणत्याही कामासाठी बारामती मग कर्जत जामखेड मधील जनता फक्त मतदानासाठी आहे का ❓ असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. येणाऱ्या नगरपरिषद निवडणूकीत सर्व हिशोब चुकता करू असे शिंदे म्हणाले.
आमदार रोहित पवार यांची नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला

जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजप नेते राम शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती. आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्याचा दावा केला होता. तो खोडून काढताना शिंदे म्हणाले, ‘हा दावा पूर्णपणे खोटा आहे. या तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यातील २३ ग्रामपंचायती निर्विवादपणे भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. तसेच 10 बिनविरोध झालेल्या पैकी चार भाजपाच्या आहेत. १० ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही’.
जामखेड तालुक्यात भाजपच्याच ग्रामपंचायती जास्त आहेत. सर्वांत मोठ्या खर्डा ग्रामपंचायतीत कोणालाच बहुमत मिळालेले नाही, असे नमूद करताना मुळात आमदाराने गावपातळीवरील राजकारणात फार लक्ष घालायचे नसते. हा संकेत आपण आतापर्यंत पाळत आलो. मात्र, पवार यांनी इतिहासात प्रथमच थेट गावपातळीवर जाऊन प्रचार केला आहे. आपण कधीच गटातटाचे राजकारण केले नाही. माझ्यावर असा आरोप करणारेच सर्व संकेत बाजूला सारत गावात जाऊन दबावाचे राजकारण करीत होते. आता हा नवीन पॅटर्न ग्रामपंचायत निवडणुकीत आणला गेला आहे. दहशत कोण करत आहे, हे लोकांना चांगले माहिती आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या काळात आम्ही मतदारसंघात विकासाची दहशत निर्माण केली. आता जे परिवर्तन झाल्याचे सांगत आहेत, त्यांनी दबावाचे आणि दहशतीचे राजकारण आणले आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की, असे राजकारण फार काळ टिकत नसते. स्वत:ला सामाजिक गुंड म्हणवून घेणाऱ्यांनी त्याचे विश्लेषण करावे. आता लवकरच नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्याची आम्ही वाट पहात असून त्यामध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार कर्जत आणी जामखेड मध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट
आमदार रोहित पवार यांची जामखेडमध्ये तर
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची चौंडी येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी नेते एका मांडवात तर ग्रामपंचायत सदस्य दुसर्या मांडवात दिसुन आले. तर काही सदस्यांनी तर चक्क दोन्ही मांडवात हजेरी लावली. एकीकडे सकाळी व दुसरीकडे सायंकाळी सध्या मतदारसंघात सामाजिक गुंड व विकासाची दहशत याची जोरदारपणे चर्चा सुरू आहे. आता नगरपरिषद निवडणूकीत सामाजिक गुंड सरस ठरतात कि. विकासाची दहशत हे पाहणे महत्त्वाचे आहे.