जामखेड मध्ये गोळीबार, आमदार रोहितपवारांचा प्रशासनावर जोरदार शब्दांत निशाणा
जामखेडमथ्ये गुंड सागर मोहळकरवर गोळीबारानंतर रोहित पवारांचं पहिलं ट्विट, गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणीजामखेड शहर गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
जामखेडमध्ये गुंड सागर मोहळकर याच्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जामखेड शहरातील न्युरानी कॉलनीत बुधवारी सायंकाळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी सागरवर गोळ्या झाडल्या. कुख्यात सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोराने सात राऊंड फायर केले.
यापैकी चार गोळ्या अंगात घुसल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनावर जोरदार शब्दांत निशाणा साधला.
“माझ्या मतदारसंघात जामखेडमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारी वेगाने फोफावत आहे. गुन्हेगारांकडून गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात अनेकदा आवाज उठवला तरी या घटनांना आळा घालण्यास पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही”, असं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले.
सागर मोहोळकर या तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या असून तो गंभीर जखमी आहे. पोलीस प्रशासनाने हे गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांचा समूळ नायनाट करावा आणि सामान्य माणसासाठी दहशतमुक्त वातावरण निर्माण करावं. तसंच सरकारनेही या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्यावं, ही विनंती”, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.
सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृह येथून जामीनावर बाहेर आला होता. त्याच्यावर 307 सह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा झालेल्या गोळीबारामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आता आमदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही वाढत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या ट्विटनंतर आता सर्वांचे लक्ष पोलीस प्रशासन आणि सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.