जामखेड न्युज – – –
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे. निवडणुकीत दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे, तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत.
ADVERTISEMENT

तर दुसरीकडे जावली तालुक्यातुन राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एक मतांनी पराभव झाला आहे.
कोरेगाव तालुक्यात सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडीक यांना समान मत पडल्यामुळे याठिकाणी टाय झाली आहे. त्यामुळे येथे चिठ्ठीचा आधार घेण्याची शक्यता आहे. तर कराडमधुन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला आहे.
खटाव तालुक्यातुन राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे विजयी झाले असून नंदकुमार मोरे यांचा पराभव झाला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना 44 तर सत्यजित पाटणकर यांना 58 मते मिळालीत. 14 मतांनी सत्यजित पाटणकर विजयी हे विजयी झाले आहेत. तर जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मतांनी पराभव झाला असून शशिकांत शिंदे यांना 24 तर ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली आहेत.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यास शेवटच्या क्षणी यश आले तरी अनेक ठिकाणी बंडखोरी झाली होती. त्यामुळे अनेक येथे धक्कादायक निकालाची चर्चा होती. त्याप्रमाणे निकाल आले आहेत.
साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो, अशी चर्चा होती. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिंदे यांच्या विरोधात उभे असलेल्या ज्ञानदेव रांजणे यांना शिंदे यांच्या विरोधकांनी ताकद दिल्याची चर्चा होती.