कौतुकास्पद! नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र केसरी पुरस्कार

0
301
जामखेड न्युज – – – 
अहमदनगर येथील सुदर्शन महादेव कोतकर याने ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला आहे. नाशिक येथील बाळू बोडखे याच्यावर मात करत त्याने ही स्पर्धा जिंकली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याच्या वतीने दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम लढत नगर येथील सुदर्शन कोतकर आणि नाशिक येथी बाळू बोडखे यांच्यात पार पाडली. यात नगरच्या सुदर्शन कोतकरने बाजी मारली. सुदर्शन कोतकरने चांदीची गदा पटकावलीये.
                      ADVERTISEMENT
 
40 मिनिटांचा खेळ रंगला
सायंकाळी कोतकर व बोडखे यांच्यात अंतिम लढतीला सुरवात झाली. केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे व तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांच्या हस्ते या कुस्तीला सुरवात करण्यात आली. कोतकर याचे वजन १२४ किलो तर बोडखे याचे वजन ८४ किलो असल्याने ही लढत एकतर्फी होईल असे वाटत होते, मात्र कोतकर याला बोडखे याने शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवले. शेवटी कोतकर याने चपळाईने टाकलेला डाव सहजासहजी लक्षात न आल्याने चित्रिकरण पाहून पंचानी निर्णय दिला. त्यामुळे अखेर सुदर्शन कोतकर याने ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला. तर, बाळू बोडखेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक नगर येथील अनिल ब्राम्हणे याने पटकावला.
कोतकरला चांदीची गदा ५१ हजारांचे बक्षीस
स्पर्धेत विजय झालेल्या सुदर्शन कोतकरला पुरस्कार म्हणून चांदीची गदा आणि ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या शिवाय ४८ किलो वजनी गटात संकेत सतरकर नगर, ५८ किलो गट पवन ढोणर नाशिक, ६५ किलो गट सुजय तनपुरे नगर, ७४ किलो गट महेश फुलमाळी नगर, ८४ किलो गट ऋषिकेश लांडे नगर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे पंच म्हणून हरियाणा येथील सनी चौधरी, विशाल जाधव, कैवल्य बलकवडे यांनी काम पहिले तर निवेदक म्हणून सांगली येथील शंकर अण्णा पुजारी यांनी काम पहिले. पारितोषिक वितरण समारंभ प्रताप ढाकणे, वैभव लांडगे,काशिनाथ पाटील लवांडे, रफिक शेख,गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. दीपक देशमुख, सिद्धेश ढाकणे, राजेंद्र शिरसाट, प्रा.अजय शिरसाट, बाळासाहेब फलके, नंदकुमार दसपुते यांच्या उपस्थितीत पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here