पद किंवा सत्तेसाठी भीक मागणे आपल्या संस्कृतीत नाही – पंकजा मुंडे

0
289
जामखेड न्युज – – – 
पद किंवा सत्तेसाठी भीक मागणे आपल्या संस्कृतीत नाही, असे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी रविवारी म्हटले. बुलढाणा येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी कोणासमोर हात पसरून सत्ता, पद आणि पदासाठी भीक मागणे ही आपली संस्कृती नाही. माझे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला पद किंवा सत्तेसाठी भीक न मागण्याची शिकवण दिली आहे असे म्हटले.
भाजपाकडून आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना संधी मिळालेली नाही. दरम्यान, तावडेंना भाजपाकडून राष्ट्रीय स्तरावर मोठी जबादारी देत, अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्यामुळे आता पुन्हा पंकजा मुंडे यांना डावलल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पंकजा मुंडेनी एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे.
                          ADVERTISEMENT
   
 “मला एखादे पद दिले की नाही याने काही फरक पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे मला सामाजिक कार्य आणि गरिबांची सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नवीन सरचिटणीसांची यादी जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना देखील प्रतिनिधित्व मिळेल. बावनकुळेंना दोन वर्षानंतर प्रतिनिधित्व मिळालं, त्यांनीही मिळेल. आम्ही सगळेजण संघटनेतील जबाबदारी आणि निवडणुकीची जबाबदारी यामध्ये संघटनेची जबाबदारी जास्त महत्वाची मानतो. त्यामुळे आता अखिल भारतीय सरचिटणीस ही जबाबदारी एवढी मोठी जबाबदारी आहे, की त्यापुढे त्यांचे दोन वर्षांपूर्वी तिकीट कापलं हा विषय मागे पडतो तरीही, राजकारणात राहणारा माणूस हा शेवटी निवडणुका लढवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी, संविधानिक पदावर जाण्यासाठी इच्छुक असतो. बावनकुळेंचं झालं, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचे देखील होईल. या वर्षभरात खूप वाव आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीसपदाची संधी दिली आहे. खासदार प्रितम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आपली ताकद पणाला लावली होती. पण प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यावर मुंडे समर्थक नाराज झाले होते. त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली होती. त्यावेळीही पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here