नगर जिल्हा रुग्णालय आयसीयु आग प्रकरणी जिल्हा नियोजन मंडळाची मोठी कारवाई 

0
257
जामखेड न्युज – – – 
जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागातील आग प्रकरणी (Ahmednagar Civil Hospital Fire) पहिली कारवाई लवकरच होणार आहे. ‘जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (Sunil Pokharna) यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, असा ठराव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. तो राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला असून त्यांच्यावर काय कारवाई करायची, याचा निर्णय आरोग्य विभाग घेणार आहे,’ अशी माहिती नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना दिली.
                             ADVERTISEMENT 
जिल्हा नियोजन मंडळाची सभा आज झाली. त्यामध्ये पुढील आर्थिक नियोजनासोबतच जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेवर वादळी चर्चा झाली. ‘बहुतांश पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी डॉ. पोखरणा यांच्याकडे बोट दाखविले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असताना डॉ. पोखरणा यांना या पदावर ठेवता कामा नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय अनेक लोकप्रतिनीधी, संघटना, रुग्णांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारींची अखेर दखल घेण्यात आली,’ असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
                     ADVERTISEMENT
आगीच्या घटनेला बराच काळ उलटला तरीही अधिकारी त्या पदावर कार्यरत कसे, कारवाईला उशीर का झाला, असे विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘अधिकाऱ्यांवर कारवाई करताना घाई करता येत नाही. ठोस कारण आणि सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. अन्यथा त्यांच्यावरील कारवाईला न्यायालयातून स्थगिती मिळते. त्यामुळे याही प्रकरणात ही काळजी घेण्यात येत आहे. याचा अर्थ कोणालाही पाठीशी घालण्यात येतंय असा नाही. केवळ आग प्रकरणच नव्हे तर यापूर्वीच्याही तक्रारी आहेत. अपंगत्वाचे दाखले देण्याची यंत्रणा आणि खरेदी समितीसंबंधीही डॉ. पोखरणा यांच्याविरुद्ध तक्रारी आहेत. त्यांची नोंद घेत नियोजन मंडळाने ठराव केला आहे. त्यावर पुढील निर्णय आरोग्य विभागाने घ्यायचा आहे. यासंबंधी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी माझे कालच बोलणे झाले आहे,’ असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
                     ADVERTISEMENT   
टोपे यांनी या घटनेबद्दल बोलताना अप्रत्यक्षपणे सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागाकडे बोट दाखविले. त्यासंबंधी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘असे कोणाकडे बोट दाखविणे चुकीचे आहे. ही सामूदायिक चूक आहे. जर निधीच उपलब्ध नसेल तर संबंधित विभाग तरी काय करणार? घडलेली घटना अत्यंत वाईट आहे. त्याबद्दल सर्वांनाच खंत वाटते आहे. याची योग्य ती चौकशी होईल. सात दिवसांत अहवाल येईल त्यानुसार दोषींवर कारवाई होईल,’ असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
                      ADVERTISEMENT  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here