शिवसेनेच्या पहिल्या विधानसभा विजयाला ५१ वर्षे पूर्ण

0
256
जामखेड न्युज – – – – 
आज राज्यात शिवसेनेची सत्ता असून राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचा कारभार पाहत आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख (स्व.)बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेल्या शिवसेना या पक्षाचे पहिले आमदार होण्याचा मान  वामनराव महाडिक यांना असून ५१ वर्षांपूर्वी २० ऑक्टोबर १९७० रोजी महाडिक यांनी कम्युनिस्ट उमेदवार सरोजिनी कृष्णा देसाई यांचा पराभव केला. त्यावेळी विजयानंतर दैनिक नवाकाळने, या विजयाची बातमी छापताना, ‘शिवसेना विधानसभेत प्रविष्ट झाली! महाडिक विजयी झाले!’ असे शीर्षक दिले होते.
शिवसेने साठी हा मोठा विजय होता आणि केवळ मुंबईचे प्रतिनिधित्व करणारी शिवसेना महाडिक यांच्या विजयाने राज्याच्या राजकारणात विधानभेच्या माध्यमातून प्रविष्ट झाली होती. दरम्यान १९९५ आणि २०१४ साली राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता होती. १९९५ युतीत शिवसेना प्रमुख पक्ष होता आणि पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांना तर नंतर नारायण राणे यांना संधी दिली. २०१४ च्या युतीच्या सत्तेत मात्र भाजप कडे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने होते. १९९५ च्या युती सत्तेत उपमुख्यमंत्रीपद होते आणि ते (स्व)गोपीनाथ मुंडे यांच्या कडे होते. मात्र २०१४ च्या युती सत्तेत उपमुख्यमंत्रीपद निर्माण केले नव्हते.
शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे.
शिवसेनेने निवडणुकीसाठी युती केलेले पक्ष
१९६८ : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती.
१९६९ : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट
१९७२ : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट)
१९७२ : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती)
१९७४ : काँग्रेस
१९७७ : दलित पँथर (काही काळापुरती)
१९७७ : काँग्रेस. ही युती १९८० साली तुटली.
१९९० ते २०१९ : भाजप
२०१९ ते सद्य (२०२१) : काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस
२०१९च्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत मिळाले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष (१०५ आमदार) असलेल्या भाजपने सरकार स्थापना करण्याचा दावा केला व देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री. परंतु सभागृहातील चाचणी मतामध्ये बहुमत मिळणार नाही हे तीन दिवसांत स्पष्ट झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा मध्यस्थीने शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले व उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here