जामखेड न्युज – – –
घर शाळेत आणि शाळा घरात शिरली पाहिजे. आई-वडिलांनी शिक्षक आणि शिक्षकांनी आई-वडील बनलं पाहिजे, हा विनोबांचा शिक्षणविषयक विचार… शिक्षण अर्थपूर्ण व आनंददायी बनण्यासाठी हा विचार खूपच उपयुक्त ठरु शकतो. तो प्रत्यक्षात आणलाय वाशिम जिल्ह्यातील जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी…!
खाकी वर्दीतला शिक्षक
अजिनाथ मोरे आपल्या कर्तव्यासोबतच परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कामही करत आहेत. ते वेळ मिळाला की परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पोलीस ठाण्यात तसंच वस्तीवर शाळा भरवतात. अजिनाथ मोरे हे पोलीस विभागात यायच्याआधी 2010 ते 2011 मध्ये शिक्षक म्हणून एका शाळेवर कार्यरत होते. मात्र त्याअगोदर आपल्याला पोलीस अधिकारी व्हायचं आहे ही जिद्द त्यांच्या मनात होत कठोर मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर ते पोलीस अधिकारी बनले पण शिक्षणावर आणि शिक्षकी पेशावर असलेलं त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.
पोलिस स्टेशन बनलं शाळा
लॉकडाऊनमध्ये बंद असणाऱ्या शाळा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान हा आता काळजीचा मुद्दा ठरलाय. त्यातच जिथे नेटवर्क आहे तिथे किमान ऑनलाईन अभ्यास तरी सुरु आहे. पण ग्रामीण भागात जिथे नेटवर्क नाही तिथे शाळाही बंद आहेत. त्यामुळे नेमकं काय करायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. याच प्रश्नावर उत्तर शोधलं आहे ते वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथील ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी….. त्यांनी एक भन्नाट कल्पना शोधलीय.
गुन्ह्यांचा छडा आणि मुलांना धडा एकाचवेळी!
त्यांनी पोलीस स्टेशनला शाळा बनवलंय. पोलीस स्टेशनमध्येच एका फळ्यानर ते विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतायत. 20 ते 25 मुलं-मुली त्यांच्या क्लासमध्ये हजेरी लावत आहेत. ज्यांना पोलीस ठाण्यात येणंं शक्य नाही त्या विद्यार्थ्यांना वस्तीवर जाऊन अजिनाथ मोरे शिक्षणाचे धडे देतात.
अजिनाथ मोरे हे विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवतात. विद्यार्थीही मन लावून शिकतात…. त्यांच्या वर्गातली मुलं छानपैकी इंग्रजीमध्ये बोलतात. खाकी वेशातले अजितराव गुन्ह्यांचा छडा आणि मुलांना धडा एकाचवेळी देतात….