जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
नवजीवन प्रतिष्ठान या संस्थेच्या पुढाकाराने जामखेड येथील डॉ.आरोळे हॉस्पिटलला होगनास इंडिया प्रा. लि. च्या वतीने देण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे उदघाटन व लोकार्पण होगनासचे एम.डी.सुनिल मुरलीधरन यांच्या हस्ते संपन्न झाले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी होगनासचे ऑपरेशन डायरेक्टर डॉ. शरद मगर, एच.आर. व अॅडमिन मॅनेजर सुभाष तोडकर, CRHP चे संचालक डॉ.रविदादा आरोळे नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, जयेश कांबळे, भगवान राऊत, असिफ पठान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जामखेड येथील डॉ. आरोळे हॉस्पिटल च्या माध्यमातून कोविड काळात सुमारे १३,००० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. याकाळात हॉस्पिटलला ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक गोष्टींची गरज भासत होती. डॉ. आरोळे हॉस्पिटलची ही गरज लक्षात घेऊन होगनास इंडियाने सामाजिक बांधिलकी जपत ऑक्सिजन निर्मिती प्लांट देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिला. यावेळी CRHP चे डॉ.रविदादा आरोळे यांनी कोविड काळात रुग्णांना मोफत उपचार तसेच रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलतर्फे मोफत जेवण देत असल्याचे सांगितले. येणाऱ्या संभाव्य लाटेविषयी सर्वांनी जागरूक राहावे असे त्यांनी यावेळी संगीतले. होगनासच्या मान्यवरांनी हॉस्पिटलच्या या सेवाभावी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
होगनास इंडियाने कोरोना काळात नवजीवनच्या समन्वयाने चिचोंडी पाटील येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, निंबळक येथील अनामप्रेम संस्था, MIDC येथील कामगार कोविड सेंटर यांना बेड व गाद्या, बुऱ्हानगर प्राथमिक आरोग्य केंद्रास कोविड संरक्षणात्मक साहित्याची देणगी दिलेली आहे तसेच १८ लाख रुपयांचे तीन व्हेंटीलेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवनचे डॉ.जयेश कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले