जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
ई-पीक पाहणी व नोंदणी मुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल याचबरोबर खरेदी केंद्रावर माल घालण्यासाठी व विविध शासकीय योजनांआचा लाभ घेण्यासाठी ई पीक नोंदणी आवश्यक आहे असे मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी सांगितले
साकत येथे मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी बाबत शेतकर्यांना माहिती दिली व प्रत्यक्ष शेतावर जाऊन नोंदणी केली. यावेळी मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे, तलाठी सचिन खेत्रे, माजी सरपंच हरीभाऊ मुरुमकर, पोलीस पाटील महादेव वराट, प्रा. पाडुंरंग वराट, बाळासाहेब वराट, सचिन मुरुमकर, बिभिषण वराट, सतिश लहाने, रामहारी वराट, अजय अडसुळ, दत्तात्रय वराट दगडू वराट, पांडुरंग वराट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गव्हाणे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे ई पीक पाहणी अॅप शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशन निर्मिती केली असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. हा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर राबवण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अॅप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल, असे गव्हाणे यांनी सांगितले.