Home ताज्या बातम्या जामखेड हादरले! लोखंडी रॉडने आई-मुलाला बेदम मारहाण करत जबरी चोरी, मिलिंदनगरातील दोघे...

जामखेड हादरले! लोखंडी रॉडने आई-मुलाला बेदम मारहाण करत जबरी चोरी, मिलिंदनगरातील दोघे गजाआड, १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

0
3
जामखेड हादरले! लोखंडी रॉडने आई-मुलाला बेदम मारहाण करत जबरी चोरी, मिलिंदनगरातील दोघे गजाआड, १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड हादरले! लोखंडी रॉडने आई-मुलाला बेदम मारहाण करत जबरी चोरी, मिलिंदनगरातील दोघे गजाआड, १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

 

जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे घरात घुसून आई-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण करत सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी मिलिंदनगर, जामखेड येथील दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत घरफोडीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी सोन्याचे मंगळसूत्र व दोन मोबाईल असा सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास भुतवडा येथील सुरेश जालींदर डोके यांच्या घरात चार अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी सुरेश डोके व त्यांच्या आईला लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र तसेच घरातील रोख रक्कम जबरीने चोरून नेली होती. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व पोलीस अंमलदारांचे पथक तपासासाठी रवाना करण्यात आले.

दि. २६ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी मिलिंदनगर परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत किरण गोविंद चव्हाण (वय १९) आणि अनिल गौतम काळे (वय १८), दोघे रा. मिलिंदनगर, जामखेड यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान या दोघांनी साथीदारांच्या मदतीने सदर जबरी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील किरण रावसाहेब काळे, रोहित अशोक काळे, कोहिनूर दिपक काळे, ओमकार फुलचंद काळे आणि करण अशोक पवार हे पाच जण फरार असल्याची माहिती तपासात समोर आली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

चौकशीत आणखी एक घरफोडी उघड
ताब्यातील आरोपींकडे अन्य गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता किरण गोविंद चव्हाण याने साथीदारासह कृष्णा भोसले यांच्या घरात चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या माहितीच्या आधारे जामखेड पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) हा घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.

मंगळसूत्र व दोन मोबाईल जप्त
चोरीच्या मंगळसूत्राबाबत तपास केला असता ते विक्रीसाठी देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर परवेज अझहर सय्यद (वय ४१, रा. बीड रोड, जामखेड) व किरण उर्फ दादा शंकर काळे (वय ३०, रा. मिलिंदनगर, जामखेड) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र सोमनाथ झुंबर खवळे यांच्याकडे ठेवण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर ६ ग्रॅम वजनाचे, सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केले. तसेच आरोपी किरण चव्हाण याने चोरीचे दोन मोबाईल स्वतःच्या घरात ठेवल्याची माहिती दिल्यानंतर २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
अशाप्रकारे सोन्याचे मंगळसूत्र व दोन मोबाईल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह जामखेड पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, शामसुंदर जाधव, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!