Sunday, September 27, 2026
Home ताज्या बातम्या बीड लोकसभा संघटनेची धुरा ॲड. अरुण जाधव यांच्या खांद्यावर! वंचित बहुजन आघाडीची...

बीड लोकसभा संघटनेची धुरा ॲड. अरुण जाधव यांच्या खांद्यावर! वंचित बहुजन आघाडीची मोठी जबाबदारी

0
2
बीड लोकसभा संघटनेची धुरा ॲड. अरुण जाधव यांच्या खांद्यावर! वंचित बहुजन आघाडीची मोठी जबाबदारी

जामखेड न्युज – – – – – 

बीड लोकसभा संघटनेची धुरा ॲड. अरुण जाधव यांच्या खांद्यावर! वंचित बहुजन आघाडीची मोठी जबाबदारी

वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी पक्षाकडून विविध लोकसभा क्षेत्रांची जबाबदारी राज्य कार्यकारी सदस्यांवर सोपविण्यात आली आहे. त्याअंतर्गत बीड लोकसभा क्षेत्राच्या संघटना बांधणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी राज्य कार्यकारी सदस्य ॲड. अरुण जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि प्रदेश सरचिटणीस प्रा. सोमनाथ साळुंके यांनी अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा क्षेत्रात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचे आव्हान ॲड. जाधव यांच्यासमोर असणार आहे. बूथ कमिट्या, ग्राम शाखा, सर्कल, तालुका तसेच जिल्हास्तरावरील संघटन मजबूत करणे, सदस्य नोंदणीला चालना देणे आणि विविध आघाड्यांची प्रभावी यंत्रणा उभारणे, या दृष्टीने त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ॲड. अरुण जाधव हे वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रियपणे कार्यरत असून, जामखेड नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत आपला राजकीय जनाधार दाखवून दिला होता.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात पक्ष संघटना उभारण्याचा अनुभव असलेल्या ॲड. जाधव यांच्याकडे आता बीड लोकसभा क्षेत्राची जबाबदारी आल्याने बीड जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराकडे लक्ष लागले आहे. गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि विविध आघाड्यांपर्यंत संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

पक्षश्रेष्ठींनी सोपविलेल्या या जबाबदारीमुळे बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संघटन बांधणीला नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावागावांत संपर्क वाढविणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि बूथनिहाय संघटन उभे करण्यावर आगामी काळात भर राहणार आहे.
दरम्यान, बीडसोबतच हिंगोली, नाशिक, वाशिम-यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, नांदेड, बुलढाणा आणि गडचिरोली-चिमूर या लोकसभा क्षेत्रांसाठीही पक्षाकडून प्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

ॲड. अरुण जाधव यांच्यावर बीड लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात बीडच्या राजकीय मैदानात पक्ष संघटना कितपत विस्तारते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!