जामखेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मुख्याधिकाऱ्यांचे गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र!
जामखेड शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना टँकरद्वारे वेळेत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी जामखेड नगरपरिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भुतवडा तलावात पाच विद्युत पंपासह चारीत पाणी टाकले जात आहे याची पाहणी नगराध्यक्षा, पाणीपुरवठा सभापती व नगरसेवक यांनी केली तसेच मौजे मांदळी येथे जामखेड नगरपरिषदेसाठी पाणी टँकर भरण्याकरिता दोन स्वतंत्र टँकर फिलिंग पॉईंट राखीव ठेवण्याची मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत विभाग आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
जामखेड शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी खैरी प्रकल्प साठवण क्षेत्रातील टँकर भरण्याच्या ठिकाणी काही तांत्रिक व भौगोलिक अडचणी निर्माण होत असल्याने पर्यायी पाणी भरण्याच्या ठिकाणाचा विचार करण्यात आला होता. त्यानुसार मांदळी येथील जलस्रोताचा पर्याय पुढे आला आहे.
नगरपरिषदेच्या पत्रानुसार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या पाणीपुरवठा टंचाई आढावा बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके, नगरसेवक विकी घायतडक, पाणीपुरवठा अभियंता व कर्मचारी यांनी मांदळी येथील प्रस्तावित टँकर फिलिंग पॉईंटची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान मांदळी येथे मुबलक जलस्रोत उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. तसेच संबंधित ठिकाणाहून जामखेड शहराचे अंतर सुमारे ४० किलोमीटर असल्याची माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे. या ठिकाणी पंचायत समिती जामखेड, कर्जत व श्रीगोंदा परिसरातील टँकरही पाणी भरण्यासाठी येत असल्याने टँकरची संख्या अधिक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
सध्या टँकर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ लागत असून, त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर परिणाम होत आहे. टंचाईच्या काळात टँकर भरण्यासाठी लागणारा वेळ कमी व्हावा, तसेच आदेशित खेपा पूर्ण करण्यासाठी टँकर लवकर भरून शहरात पोहोचावेत, या उद्देशाने मांदळी येथे जामखेड नगरपरिषदेसाठी दोन टँकर फिलिंग पॉईंट राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
यासाठी संबंधित ग्रामपंचायत व यंत्रणेने वस्तुस्थितीचा विचार करून जामखेड नगरपरिषदेच्या टँकरसाठी दोन स्वतंत्र पॉईंट राखीव ठेवण्याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती मुख्याधिकारी यांनी पत्राद्वारे केली आहे.
आता मांदळी येथे दोन टँकर फिलिंग पॉईंट राखीव ठेवण्याच्या मागणीवर उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे टँकर भरण्यासाठी होणारा विलंब कमी होऊन शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.