दुष्काळाने गांजलेल्या बळीराजाला चोरट्यांनी लुटले! रत्नापूरात एका रात्रीत सहा शेतकऱ्यांच्या केबल गायब
जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल सहा शेतकऱ्यांच्या विहिरीवरील वीजपंप व सोलर मोटारींच्या केबल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोमीनाथ लक्ष्मण दरे (वय ४५, व्यवसाय शेती, रा. रत्नापूर, ता. जामखेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १३ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी रत्नापूर शिवारातील आपल्या शेतात मका व घास पिकाला पाणी दिले आणि त्यानंतर घरी परतले.
दि. १४ रोजी सकाळी साडेसहा वाजता ते पुन्हा शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. विहिरीवरील सोलर व इलेक्ट्रिकल मोटर सुरू करण्यासाठी गेले असता, तेथील सुमारे ७० मीटर लांबीची केबल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी केबल तोडून चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीस गेलेल्या केबलची अंदाजे किंमत ७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, याच रात्री परिसरातील आणखी पाच शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबलही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये जलाल अजमोद्दीन पांगरकर, सुनील रामचंद्र पवार, एकनाथ जयवंत पवार, किरण अंकुश मोरे आणि अविनाश जालिंदर पवार यांचा समावेश आहे.
पिकांना पाणी द्यायचे कसे? शेतकऱ्यांसमोर नवे संकट सध्या तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, उपलब्ध पाण्यावर शेतकरी मका, घास यासह इतर पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत विहिरीवरील वीजपंप किंवा सोलर मोटरच्या केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. केबल पुन्हा खरेदी करून बसविण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार असल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक भार पडला आहे.
यापूर्वीही केबल चोरीच्या घटना तपासाबाबत शेतकऱ्यांची नाराजी रत्नापूर परिसरात यापूर्वीही शेतकऱ्यांच्या वीजपंपांच्या केबल चोरीच्या घटना घडल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, या घटनांचा तपास लागला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणातील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने ताब्यात घ्यावे, तसेच परिसरातील यापूर्वीच्या केबल चोरीच्या घटनांचाही तपास करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी रत्नापूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. जामखेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.