१० लाखांच्या लुटीचा थरारक, डोळ्यात मिरची पूड टाकल्याचा दावा
खर्डा पोलिसांच्या तपासात काही तासांत पर्दाफाश
जामखेड-खर्डा महामार्गावर डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल १० लाख ५० हजार रुपये आणि मोबाईल लुटल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, खर्डा पोलिसांनी केलेल्या वेगवान आणि बारकाईच्या तपासात या कथित लुटीमागेच बनाव असल्याचे समोर आले. देणेकऱ्यांपासून बचाव करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार रचल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) दुपारी १२.०७ वाजता डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून जामखेड-खर्डा महामार्गावरील सतेवाडी फाट्याजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी डोळ्यात मिरची पूड टाकून पैशांची बॅग आणि मोबाईल लुटल्याची माहिती देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत कथित घटनेची माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांची पडताळणी सुरू केली.
सीसीटीव्ही फुटेजने संशयाला मिळाला बळ तक्रारदार बालाजी अर्जुन लांडगे (वय ३९, रा. सुर्वेगल्ली, खर्डा) यांनी पुण्याहून येत असताना विनाक्रमांकाच्या स्प्लेंडरवरून आलेल्या व्यक्तींनी लूट केल्याचा दावा केला होता.
मात्र, पोलिसांनी जामखेड रोडवरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तक्रारीत सांगितल्याप्रमाणे कोणतीही संशयित गाडी त्या मार्गावरून गेल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
कसून चौकशीत कथित बनावाचा पर्दाफाश सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामध्ये तफावत आढळल्यानंतर पोलिसांनी बालाजी लांडगे याची कसून चौकशी केली. त्यानंतर देणेकऱ्यांचे पैसे देणे टाळण्यासाठी आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी लुटीचा बनाव रचल्याचे त्याने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२ अंतर्गत खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर तसेच संभाजी शेंडे, शशी म्हस्के, बाळू खाडे, राहुल खेडकर आणि प्रवीण थोरात यांच्या पथकाने केली.
डायल ११२चा गैरवापर करू नका दरम्यान, आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ सेवेवर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विनाकारण अथवा खोटी माहिती देऊन आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांनी दिला आहे.
या घटनेमुळे पोलिसांच्या तत्पर तपासासोबतच सीसीटीव्हीच्या माध्यमातून कथित गुन्ह्याची पडताळणी किती महत्त्वाची ठरते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.