तरुण वयातच महेशची एक्झिट, २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने राजेवाडी हादरले!
जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील २६ वर्षीय तरुणाचा बावी शिवारात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. महेश बिभिषण कुमटकर (वय २६, रा. राजेवाडी, ता. जामखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने राजेवाडी तसेच बावी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कुमटकर हा बावी गावच्या शिवारातील एका शेतात मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृत महेश कुमटकर यांचे मामा रामा नवनाथ गोरे (रा. राजेवाडी) यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेशच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची पार्श्वभूमी आणि मृत्यूचे कारण याबाबत जामखेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, अवघ्या २६व्या वर्षी महेशचा झालेला दुर्दैवी मृत्यू कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठी मोठा धक्का ठरला आहे.
राजेवाडी आणि बावी परिसरात या घटनेने शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.