Monday, August 31, 2026
Home ताज्या बातम्या ‘मतांची ताकद दाखवा, हक्कांसाठी एकजूट व्हा’, भटके-विमुक्तांसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांचा एल्गार ...

‘मतांची ताकद दाखवा, हक्कांसाठी एकजूट व्हा’, भटके-विमुक्तांसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांचा एल्गार पुण्यात राज्यस्तरीय भटके-विमुक्त परिषद; ‘मत विकणार नाही, दुसऱ्यालाही विकू देणार नाही’ असा निर्धार करण्याचे आवाहन

0
3
‘मतांची ताकद दाखवा, हक्कांसाठी एकजूट व्हा’, भटके-विमुक्तांसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांचा एल्गार  पुण्यात राज्यस्तरीय भटके-विमुक्त परिषद; ‘मत विकणार नाही, दुसऱ्यालाही विकू देणार नाही’ असा निर्धार करण्याचे आवाहन

जामखेड न्युज – – – – – 

‘मतांची ताकद दाखवा, हक्कांसाठी एकजूट व्हा’, भटके-विमुक्तांसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

पुण्यात राज्यस्तरीय भटके-विमुक्त परिषद; ‘मत विकणार नाही, दुसऱ्यालाही विकू देणार नाही’ असा निर्धार करण्याचे आवाहन

 

भटके-विमुक्त समाजाने आपल्या हक्कांसाठी राजकीयदृष्ट्या सक्षम आणि संघटित होणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांची ताकद दाखवली, तरच समाजाला हक्क व अधिकार मिळवून देण्याबरोबरच आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

भटके विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या वतीने पुण्यातील साने गुरुजी स्मारक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय भटके-विमुक्त परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, “आपल्या विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणायची असेल तर गावागावात जाऊन जनजागृती केली पाहिजे. निवडणुकीच्या वेळी मी माझ्या मताची किंमत करणार नाही, स्वतःला विकणार नाही आणि दुसऱ्यालाही विकू देणार नाही,” असा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे. कष्टाच्या जोरावर जगत असताना स्वाभिमानाने जीवन जगणे आवश्यक असून, कोणाचीही गुलामगिरी किंवा लाचारी स्वीकारू नये, असे त्यांनी सांगितले.
‘हक्काचे प्रतिनिधी सभागृहात असणे गरजेचे’

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १९९० मध्ये काढलेल्या बिऱ्हाड मोर्चाची आठवण करून दिली. त्या काळातील संघर्षाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, न्यायालय एखादा कायदा रद्द करू शकते; मात्र नवीन कायदे करण्यासाठी विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा यांसारख्या लोकशाहीच्या सभागृहांमध्ये आपले हक्काचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्यामुळे भटके-विमुक्त समाजाने राजकीय प्रतिनिधित्वासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
‘ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणुका लढवा’

परिषदेचे संयोजक तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी भटके-विमुक्त समाजाला स्वाभिमानी जीवन मिळवून देण्यासाठी संघटित लढ्याची गरज व्यक्त केली.
ते म्हणाले की, मागील महिन्यात राज्यभर ‘मुसाफिर यात्रा’ काढून भटके-विमुक्त समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. पुण्यातील परिषदेसाठी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तसेच भटक्या-विमुक्तांच्या पालांवर जाऊन संवाद साधण्यात आला.. 

संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी समाजाने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा सर्व स्तरांवरील निवडणुका लढवून त्या जिंकण्याची तयारी समाजाने केली पाहिजे. राजकीय प्रतिनिधित्व वाढले तरच समाजाचा आवाज अधिक बुलंद होईल, असे ॲड. डॉ. जाधव यांनी सांगितले.

पुस्तकाचे प्रकाशन; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
या परिषदेत ॲड. डॉ. अरुण जाधव लिखित ‘भटक्या विमुक्तांच्या पंचाहत्तरी’ या पुस्तकाचे प्रकाशन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून परिषदेचे उद्घाटन झाले.

प्रारंभी शाहीर सचिन माळी, शीतल साठे व सहकाऱ्यांनी आंबेडकरी नवयान जलसा सादर केला. लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष तथा भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. बाबुराव सुरपे यांनी आभार मानले.

पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक
परिषदेच्या उद्घाटनापूर्वी सकाळी ११ वाजता सारसबागेजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून भटके-विमुक्त प्रवर्गातील पारंपरिक लोककलावंतांची वेशभूषा, वाद्ये, नृत्य आणि संगीतासह भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत नंदीवाले, वासुदेव, पिंगळा जोशी, मरीआईवाले, गोंधळी, उंटवाले, रायरंद, बहुरूपी, गोसावी, चित्रकथी, डोंबारी, कोल्हाटी, नाथपंथी डवरी गोसावी यांसह विविध समाजघटकांतील कलावंत व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम, ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाने, ॲड. अरविंद तायडे, प्राचार्य बाबुराव शिंदे, डॉ. दीपा राजमाने, उमाताई जाधव, अंबरसिंग चव्हाण यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल पवार, ऋषिकेश गायकवाड, संदीप आखाडे, ललिता पवार, रेश्मा औटी, भक्ती पवार, मच्छिंद्र जाधव, संदीप आव्हाड, सागर कांबळे, उर्मिला कवडे, नीता इंगळे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!