विद्यार्थी हेच आपले दैवत – प्राचार्य बाळासाहेब पारखे
जामखेड केंद्राच्या शिक्षण परिषदेत बाळासाहेब पारखे यांचा गौरव
जामखेड केंद्राच्या वतीने ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच राज्यस्तरीय योग पंच म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना पारखे यांनी, “माझा झालेला सन्मान हा केवळ माझा नसून संपूर्ण जामखेड केंद्राचा सन्मान आहे,” अशी भावना व्यक्त केली.
जामखेड केंद्राच्या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी शैक्षणिक गुणवत्तावाढ, शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्राचार्य बाळासाहेब पारखे म्हणाले की, जामखेड केंद्रातील ४३ अॅप आणि ५९ विषयांचा अभ्यास करून त्यातील शैक्षणिक बाबी समजून घेणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीतही बदल होत असून शिक्षकांनी सातत्याने नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“विद्यार्थ्यांचे आपण प्रेरणास्थान आहोत आणि विद्यार्थी हेच आपले दैवत आहेत. त्यांच्या भवितव्याला योग्य दिशा देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे,” असे प्रतिपादनही पारखे यांनी केले. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरती भूमिका न ठेवता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी आवाहन केले.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तसेच राज्यस्तरीय योग पंच म्हणून निवड झाल्याबद्दल जामखेड केंद्रातील शिक्षकांच्या वतीने पारखे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास केंद्रप्रमुख कलीम शेख, पर्यवेक्षक सुदाम वराट, मुख्याध्यापक दत्तात्रय यादव, मच्छिंद्र खैरे, अंबादास जोगदंड, बाळासाहेब औटी, विकास बगाडे, जालिंदर अहिरे, देशमुख सर, संतोष पवार, हनुमंत वराट, सुभाष बोराटे, निशा कदम, वंदना मोरे, सीमा निकम यांच्यासह जामखेड केंद्रातील शिक्षक व अनेक मान्यवर उपस्थित होते.