Home ताज्या बातम्या पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे कटिबद्ध; जिल्हास्तरीय अधिवेशन लवकरच –...

पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे कटिबद्ध; जिल्हास्तरीय अधिवेशन लवकरच – वसंत लोढा

0
5
पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे कटिबद्ध; जिल्हास्तरीय अधिवेशन लवकरच – वसंत लोढा

जामखेड न्युज – – – – – – 

पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे कटिबद्ध; जिल्हास्तरीय अधिवेशन लवकरच – वसंत लोढा

.

पतसंस्था चळवळीसमोरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे कटिबद्ध असून, जिल्ह्यातील पतसंस्थांचे अधिवेशन लवकरच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पतसंस्था फेडरेशनचे नाशिक विभागीय अध्यक्ष वसंत लोढा यांनी दिली.

 

जामखेड येथे नागरी, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांच्या चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी (दि. १३) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक विभागातील नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तसेच कर्जत-जामखेड तालुका पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष वसंत लोढा, तालुका अध्यक्ष तथा ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ हजारे, रेणुका माता मल्टिस्टेटचे चेअरमन व अर्थतज्ज्ञ प्रशांत भालेराव, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, जामखेडचे तालुका उपनिबंधक दिलीप तिजोरे, कर्जतचे उपनिबंधक तान्हाजी टेकाळे, यशवंत नागरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कोठारी, मराठा सेवा पतसंस्थेचे उपाध्यक्ष उदय अनभुले, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले तसेच सहनिबंधक तान्हाजी कवडे, प्रशांत खोपटीकर आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना वसंत लोढा म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ राज्यात चांगली आहे. मात्र, काही पतसंस्था अडचणीत असल्याने त्याचा त्रास चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या पतसंस्थांनाही सहन करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तसेच पतसंस्थांबाबत लागू होणाऱ्या नवीन नियमांची माहिती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मिळावी, यासाठी जिल्हाभर कार्यशाळा घेण्यात येत आहेत.शासनाकडून अनेक नवीन नियम लागू केले जात आहेत.

बँकिंग क्षेत्रात संचालकांच्या कार्यकाळाबाबत असलेला नियम भविष्यात पतसंस्थांनाही लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ज्या संचालकांच्या विश्वासावर पतसंस्था उभ्या राहिल्या आहेत, त्यांनाच पुन्हा संधी मिळाली नाही तर ठेवीदारांसमोर जबाबदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारकडून पतसंस्थांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. तसेच नफ्यातील काही भाग संचालकांना देण्यासंदर्भातही भविष्यात बदल होण्याची शक्यता आहे. अशा विविध बदलांची माहिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक असल्याने प्रशिक्षणाची गरज आहे, असे लोढा यांनी सांगितले.

कर्जत-जामखेडमधील कार्यशाळांना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पतसंस्था चळवळ निकोप, पारदर्शक आणि टिकाऊ राहण्यासाठी चेअरमन, संचालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी भविष्यातील प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. आगामी काळात पतसंस्थांवर मोठ्या जबाबदाऱ्या येणार असून, त्यामुळे सहकार विभागावरील कामाचा भार कमी होण्यासही मदत होईल. पतसंस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

‘संपर्कातून प्रश्न सुटतात’ : दिलीप तिजोरे
तालुका उपनिबंधक दिलीप तिजोरे यांनी पतसंस्था आणि सहकार विभागातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. “संपर्कातून प्रश्न सुटतात आणि चांगल्या कामाला प्रतिसाद मिळतो. उपनिबंधक व पतसंस्था यांच्यातील दुवा म्हणून फेडरेशन काम करते,” असे ते म्हणाले.
पतसंस्था चळवळ ही भाग्यवान लोकांची चळवळ असून, ज्यांना कुणाचा आधार नाही त्यांना पतसंस्था आधार देण्याचे काम करते. गरजू व्यक्तींना पत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम पतसंस्था करतात. त्यामुळे ग्राहकांच्या केवायसीसह सर्व बाबतीत पारदर्शकता ठेवून चांगल्या कामाची स्पर्धा करावी, असे आवाहन तिजोरे यांनी केले.

उत्कृष्ट पतसंस्थांचा गौरव
या कार्यशाळेत कर्जत-जामखेड तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पतसंस्थांचा फेडरेशनच्या वतीने गौरव करण्यात आला. यामध्ये ज्योती क्रांती पतसंस्था, यशवंत नागरी पतसंस्था, राजश्री शाहू पतसंस्था (जामखेड), भैरवनाथ पतसंस्था (हाळगाव), धनसारथी पतसंस्था (खर्डा), आणखेरीदेवी महिला पतसंस्था (फक्राबाद), नंदादेवी पतसंस्था (नान्नज), पुण्यश्लोक अहिल्यादेवी पतसंस्था (पिंपरखेड), वृषाली जंजीरे पतसंस्था (परिटवाडी), रावसाहेब देशमुख पतसंस्था (राशिन) यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले. प्रास्ताविक व आभार फेडरेशनचे तालुका अध्यक्ष तथा ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ हजारे यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!