यात्रोत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
जामखेड शहराचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर महाराज यांच्या यात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली असून, यात्रेच्या निमित्ताने बीड रोडवरील एमआयडीसी मैदानावर भव्य आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंदमेळ्याचे नारळ फोडून उत्साहपूर्ण वातावरणात भूमिपूजन करण्यात आले.
श्रीनागेश्वर यात्रेला जामखेड शहरासह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने यंदाही यात्रोत्सवात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांसह नागरिकांना मनोरंजनाची पर्वणी मिळावी, यासाठी एमआयडीसी मैदानावर आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आनंदमेळ्यामध्ये विविध मनोरंजनाची साधने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी तसेच लहान-मोठ्यांसाठी विविध आकर्षणे उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे यात्रेच्या भक्तिमय वातावरणात आनंदमेळ्यामुळे आणखी रंगत वाढणार आहे.
आनंदमेळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, सभापती शरद कार्ले, अमितभाऊ चिंतामणी, अजयदादा काशिद, डॉ. भगवान मुरूमकर, नगरसेवक विकी घायतडक, नगरसेवक हर्षद काळे, प्रविण होळकर, ऋषिकेश मोरे, नगरसेवक संतोष गव्हाळे, नगरसेवक मोहन पवार यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, आयोजक, व्यापारी, नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. श्रीनागेश्वर यात्रोत्सव शांततेत, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी केले.
एमआयडीसी मैदानावरील या भव्य आनंदमेळ्यामुळे जामखेडकरांसह परिसरातील नागरिकांना मनोरंजनाची मोठी पर्वणी मिळणार असून, श्रीनागेश्वर यात्रेच्या उत्साहात यामुळे आणखी भर पडणार आहे.