भुतवड्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; आई-मुलाला मारहाण करून ६५ हजारांचा ऐवज लंपास लोखंडी रॉडने मारहाणीत महिला गंभीर जखमी; एकाच रात्री तीन घरांतही चोरी
लोखंडी रॉडने मारहाणीत महिला गंभीर जखमी; एकाच रात्री तीन घरांतही चोरी
जामखेड तालुक्यातील भुतवडा (तलाववस्ती) येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून आई-मुलाला मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी सुरेश जालिंदर डोके (वय ३३, रा. भुतवडा, तलाववस्ती, ता. जामखेड) यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, सुरेश डोके हे १० ऑगस्ट रोजी सकाळी भाड्याने गाडी घेऊन बाहेर गेले होते.
११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दीड वाजता ते आपल्या घरी परतले. रात्री दोनच्या सुमारास घरातील लाईट सुरू करून दरवाजा किंचित उघडा ठेवून ते जेवण करत असताना अचानक चार अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश केला. या चारही चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क बांधले होते. त्यापैकी एकाने चॉकलेटी रंगाचा शर्ट, दुसऱ्याने हिरव्या रंगाचा शर्ट, तिसऱ्याने पट्टे असलेला पांढरा टी-शर्ट, तर चौथ्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. सर्व चोरटे अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घरात घुसल्यानंतर चोरट्यांनी सुरेश डोके आणि त्यांची आई केशरबाई यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर घरातील सामानाची उचकापाचक करून केशरबाई यांच्या गळ्यातील अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. तसेच घरातील पेटीत ठेवलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुरेश डोके यांचा अंदाजे ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.
मारहाणीत सुरेश डोके व केशरबाई जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र केशरबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एकाच रात्री आणखी तीन घरांत चोरी? दरम्यान, ११ ऑगस्टच्या रात्री गावातील बाबासाहेब भगवान डोके, अजिनाथ श्रीधर डोके आणि अशोक आण्णा डोके यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती मिळाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे एकाच रात्री परिसरात चोरीच्या घटनांची मालिका घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना समोरून पाहिल्यास आपण त्यांना ओळखू शकतो, असेही सुरेश डोके यांनी पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश अघाव पुढील तपास करीत आहेत. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.