Sunday, September 6, 2026
Home शैक्षणिक बातम्या मुंबईत जामखेडच्या धनगरवस्ती शाळेचा डंका! शिक्षणमंत्र्यांसमोर लहू बोराटेंनी मांडले गुणवत्तेचे प्रयोग

मुंबईत जामखेडच्या धनगरवस्ती शाळेचा डंका! शिक्षणमंत्र्यांसमोर लहू बोराटेंनी मांडले गुणवत्तेचे प्रयोग

0
2
मुंबईत जामखेडच्या धनगरवस्ती शाळेचा डंका! शिक्षणमंत्र्यांसमोर लहू बोराटेंनी मांडले गुणवत्तेचे प्रयोग

जामखेड न्युज – – – – – 

मुंबईत जामखेडच्या धनगरवस्ती शाळेचा डंका! शिक्षणमंत्र्यांसमोर लहू बोराटेंनी मांडले गुणवत्तेचे प्रयोग

 

तालुक्यातील देवदैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्तीच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. दि. २ सप्टेंबर रोजी मुंबईतील जवाहर बालभवन येथे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन’ बैठकीत शिक्षक लहू बोराटे यांना आपल्या शाळेतील विविध प्रयोग व उपक्रम सादर करण्याची संधी मिळाली.

चार तासांच्या या बैठकीत शिक्षण सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील शाळांचा गुणवत्तापूर्ण विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबाबत चर्चा केली. दुर्गम भागातील छोट्याशा वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेचे काम थेट शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने देवदैठण परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.या यशाचे श्रेय शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच शाळेला सहकार्य करणाऱ्या शिक्षणप्रेमींना देत लहू बोराटे यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.

तालुक्यातील देवदेवण केंद्रांतर्गत असलेल्या जि.प.प्रा.शाळा धनगरवस्ती, देवदेवण या शाळेने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच भौतिक सुविधा, स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेचा परिसर पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील शाळादेखील नियोजन, लोकसहभाग आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आकर्षक व गुणवत्तापूर्ण बनू शकतात, याची प्रचिती येते.

शाळेच्या परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण, आकर्षक रंगरंगोटी तसेच विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कारांची प्रेरणा मिळेल अशा विविध भित्तीचित्रांची निर्मिती करण्यात आली आहे. विविध विषयांवरील चित्रांमुळे शाळेच्या भिंती जणू बोलक्या झाल्या असून, विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे.

शाळेच्या भिंतींवर भारतीय संस्कृती, विविध समाजघटक, राष्ट्रीय एकात्मता, देशातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यांचे आकर्षक चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळण्याबरोबरच त्यांच्या ज्ञानातही भर पडत आहे.
शाळेच्या आवारात विविध झाडे व रोपांची लागवड करून सुंदर व हरित परिसर तयार करण्यात आला आहे. स्वच्छ व सुबक परिसरामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांकडेही लक्ष देण्यात आले आहे.
या शाळेच्या उपक्रमामागे प्रशासनाचे मार्गदर्शन, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहभाग असल्याचे शाळेच्या सादरीकरणातून दिसून येते.

“प्रेरणा व मार्गदर्शन” या माध्यमातून विविध अधिकारी व शिक्षण विभागातील मान्यवरांनी शाळेला प्रोत्साहन दिले आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदाडे, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ तसेच केंद्रसमन्वयक केशव गायकरवाड यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करण्यात आला आहे.

ग्रामीण वस्तीतील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने शाळेने केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. शाळेच्या भिंतीवरील रंगीत चित्रांपासून ते हिरवाईने नटलेल्या परिसरापर्यंतचा हा प्रवास ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी सकारात्मक आदर्श ठरत आहे.

जामखेड तालुक्यातील इतर शाळांनीही अशा उपक्रमांतून प्रेरणा घेऊन शाळा परिसराचा कायापालट करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!