जामखेडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन; साठे नगरच्या विकासाला नवी दिशा पुण्यतिथी व जयंतीच्या औचित्याने सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
जामखेडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन; साठे नगरच्या विकासाला नवी दिशा
पुण्यतिथी व जयंतीच्या औचित्याने सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच जामखेड नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमितभाऊ चिंतामणी यांच्या विशेष प्रयत्नातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील साठे नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
समाजातील सर्व घटकांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या सामाजिक सभागृहाची उभारणी करण्यात येत आहे. या सभागृहामुळे साठे नगर परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमितभाऊ चिंतामणी, प्रा. मधुकर राळेभात, उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात, अमित चिंतामणी, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगरसेवक विकी घायतडक, अॅड अरूण जाधव, अॅड प्रविण सानप, पवन राळेभात, श्रीराम डोके, अर्जुन म्हेत्रे, नंदा होळकर, मनोज कुलकर्णी, डॉ. प्रदीप कात्रजकर, सदाफुले मॅडम यांच्या सहनगरसेवक, नगरसेविका, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लहुजी वस्ताद सैनिक तसेच परिसरातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या, श्रमिकांच्या सन्मानाच्या आणि परिवर्तनवादी विचारांचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील वंचित, पीडित घटकांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणारे हे सामाजिक सभागृह समाजोपयोगी कार्याचे केंद्र ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई चिंतामणी तसेच मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्या संकल्पनेचे स्वागत केले.
कु.तृप्ती उकिर्डे या विदयार्थिनीने मनोगत व्यक्त केले मांगाची पोर आहे…माग नाही सरणार… असे ध्येर्य उदगार काढले..