राम निकम यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार
पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख राम निकम यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा ‘आदर्श केंद्रप्रमुख’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
राम निकम यांनी १२ सप्टेंबर १९९१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर मोहा, फक्राबाद आणि देवदैठण येथे पदवीधर शिक्षक, तर खर्डा येथे ग्रेड मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. पदवीधर शिक्षक व ग्रेड मुख्याध्यापक म्हणून प्रदीर्घ सेवा केल्यानंतर २०२४ पासून केंद्रप्रमुख म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. आजपर्यंत त्यांनी तब्बल ३५ वर्षांची शैक्षणिक सेवा पूर्ण केली आहे.
केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी पाटोदा केंद्रासोबत नान्नज आणि जामखेड केंद्राचा अतिरिक्त पदभारही सांभाळला. पाटोदा केंद्रातील जिल्हा परिषदेच्या १६ शाळा तसेच चार खासगी माध्यमिक विद्यालयांच्या प्रशासकीय कामकाजाचे त्यांनी प्रभावीपणे नियोजन केले. सर्वांना विश्वासात घेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर त्यांनी विशेष भर दिला.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा केंद्रातील कुसडगाव आणि रत्नापूर येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जिल्हास्तरावर उल्लेखनीय सहभाग नोंदविला. तसेच केंद्रातील शाळांमध्ये परसबाग निर्मिती, SQAAF स्वयंमूल्यमापन, विद्या समीक्षा केंद्रावरील दैनंदिन उपस्थितीची नोंद, शिक्षण परिषदांचे उत्कृष्ट सादरीकरण यांसह विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये प्रभावी सहभाग राहिला.
राम निकम यांच्या शैक्षणिक कार्याची यापूर्वीही दखल घेण्यात आली असून, २००९ मध्ये त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसडगाव येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतही चांगली कामगिरी केली. प्रशासकीय कौशल्य, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न आणि विविध उपक्रमांतील सक्रिय सहभाग या कार्याची पावती म्हणून त्यांची आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
या पुरस्कारामुळे जामखेड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून राम निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, बीडचे माजी आमदार सुनील धांडे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्ष अमित चिंतामणी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, तसेच सर्व केंद्रप्रमुख आणि तालुक्यातील शिक्षकांनी राम निकम यांचे अभिनंदन केले आहे.