महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जामखेड शहरात अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांचे उत्साहपूर्ण व जंगी स्वागत करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी, फलक आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या स्वागत सोहळ्यामुळे जामखेड शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमस्थळी मंत्री भुजबळ यांचे आगमन होताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फेटे, पुष्पहार व गुलाल उधळत जोरदार स्वागत केले. “ओबीसी समाजाचा विजय असो”, “छगन भुजबळ आगे बढो” अशा घोषणांनी परिसर गजबजून गेला. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी मार्गदर्शन करताना ना. भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, “ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी मी सदैव लढत आलो आहे आणि पुढेही लढत राहणार आहे. तळागाळातील समाजाच्या अडचणी समजून घेत त्यावर ठोस उपाययोजना करणे ही आपली जबाबदारी आहे. संघटनेची बांधणी मजबूत केल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवून काम करावे.”
ते पुढे म्हणाले की, “समाजकारण करताना सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक ऐक्य आणि समता यावर भर देत काम केल्यासच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. तरुणांनी पुढे येऊन नेतृत्व स्वीकारावे आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे.”
या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन म्हेत्रे, तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, शहराध्यक्ष राजू शेलार, कार्यकारिणी सदस्य महेश थोरात, प्रवक्ते डॉ. नागेश गवळी, आरिफ सय्यद, शरद म्हेत्रे, अन्सार सय्यद, माऊली राळेभात, अजिंक्य यादव, संजय बेलेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत, सत्कार आणि मार्गदर्शनपर भाषणांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.