जामखेड न्युज – – –
गेले काही आठवडे दडी मारल्याने पावसाने अखेर दर्शन दिले आहेत. राज्याच्या विविध भागांत काल (मंगळवारी) जोरदार पाऊस झाला आहे. नांदेडच्या किनवटमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. किनवटच्या इस्लापुर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. इकडे अहमदनगर जिल्ह्यांतल्या अनेक तालुक्यात पाऊस पडला. तर विदर्भातही पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. तसंच आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे._
नांदेडच्या किनवटमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापुर परिसरात रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे इस्लापुर परिसरात सर्वत्रच पाणी साचल्याचे चित्र आहे. या भागातील परोटी, रिठा आणि नांदगाव गावाच्या शिवारात पावसाचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे अनेक पीक हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. त्यातच याच परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत, त्यातून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय.
विदर्भात रिपरिप, बळीराजा सुखावला
नागपुरात काल 12 तासात 17.1 मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचलं होतं. तर अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. वाशिम जिल्ह्यात काल (मंगळवार) दिवसभर रिमझिम पाऊस बरसला. जिल्ह्यात दिवसभर सर्वदूर पाऊस झाल्यामुळे पिकाला नवसंजीवनी मिळाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय.
अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार
अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावलीये. महिनाभराच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस पडला असून या पावसाने बळीराजा सुखावलाय. तसेच नगर शहरात जोरदार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढतांना नागरिकांची धांदल उडाली. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. तर सायंकाळनंतर पावसाला सुरूवात झाली.
सात जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट
कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलाय. तर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.






