जामखेड न्युज – – –
तालिबानने कब्जा मिळवलेल्या अफगाणिस्तानमध्ये अनागोंदी कायम असून, भारताने मंगळवारी काबूल दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना मायदेशी आणले. आता अफगाणिस्तानातील उर्वरित भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
काबूलच्या भारतीय दूतावासातून सोमवारी ४० कर्मचाऱ्यांना भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानातून मायदेशी आणण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात या दूतावासातील राजनैतिक अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधींसह १५० जणांना मंगळवारी सुखरूप भारतात आणण्यात आले. ही गुंतागुंतीची आणि अवघड मोहीम राबविण्यात सहकार्य केल्याबद्दल सर्व संबंधितांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आभार मानले.
अफगाणिस्तानमधील बिकट परिस्थितीमुळे भारताने अफगाणिस्तानासाठी आपत्कालीन ‘ई-व्हिसा’ देण्याचा निर्णय घेतला. त्यात कुठल्याही विशिष्ट धर्मासाठी प्राधान्य दिले जाणार नसून, सर्व धर्मीयांसाठी ‘ई व्हिसा’ची सुविधा उपलब्ध असेल, असे मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.






