Friday, March 27, 2026
Home ताज्या बातम्या वीज समस्यांवरून आरती देवमाने यांचा जवळ्यात रास्ता रोकोचा इशारा

वीज समस्यांवरून आरती देवमाने यांचा जवळ्यात रास्ता रोकोचा इशारा

0
2

जामखेड न्युज—–

वीज समस्यांवरून आरती देवमाने यांचा जवळ्यात रास्ता रोकोचा इशारा

 

जवळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्या आरती देवमाने या पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर व सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे त्यांनी महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जवळा (ता. जामखेड) येथील ३३ केव्ही उपकेंद्राअंतर्गत मागील काही दिवसांपासून विजेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. सततचा लंपडाव, कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच वारंवार जळणारे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) यामुळे शेतकरी व नागरिक हैराण झाले आहेत.

रोहित्र वेळेत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी खर्च करून दुरुस्ती करावी लागत असून त्यांचा आर्थिक भार वाढत आहे.

याशिवाय कमी दाबामुळे शेती पंप जळण्याच्या घटना वाढल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक वर्षांपासून योग्य देखभाल न झाल्याने तारा तुटणे, वीज खांब पडणे अशा घटना वारंवार घडत आहेत.

दरम्यान, सायंकाळी ६ ते १० या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारामुळे चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता तसेच वन्यप्राण्यांचा धोका देखील वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर, महावितरणने तात्काळ उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत न केल्यास सोमवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता जवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सौ. देवमाने यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी होणाऱ्या या आंदोलनाला परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आरती देवमाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!