जामखेड आरोग्य वर्तुळात खळबळ वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मोराळे त्रस्त
जामखेड ग्रामीण रुग्णालयातील प्रशासकीय शिस्त आणि रुग्णसेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीमुळे धोक्यात आली आहे. येथील मुजोर कंत्राटी कर्मचारी आणि काही अधिपरिचारिकांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे वैतागून कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मोराळे यांनी अखेर आपली बदली करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे पद सोडावे लागल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी व तोंडी आदेशांची जाणीवपूर्वक पायमल्ली करणे, रुग्णालयातील अंतर्गत गोपनीय माहिती बाहेर पुरवणे आणि कर्मचाऱ्यांमध्ये गटबाजी निर्माण करून प्रशासकीय कामात अडथळे आणण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते.कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून डॉ.मोराळे यांनी रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी घेतलेल्या निर्णयांना सातत्याने विरोध केला जात होता.
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोषींना पाठीशी घालणारे कोण? अनेक तक्रारी होऊनही कारवाई न होण्यामागे नेमके कोणाचे राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त कोणाचे ?
जर वर्ग-१ च्या दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे बदली घ्यावी लागत असेल, तर हे स्थानिक प्रशासनाचे मोठे अपयश आहे. ही केवळ एका अधिकाऱ्याची बदली नसून प्रामाणिक रुग्णसेवेचा झालेला पराभव आहे.-योगेश अब्दुले रुग्ण कल्याण सामाजिक कार्यकर्ते”
वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि अधिकाऱ्याची असहायता डॉ.मोरळे यांनी या गंभीर बाबींकडे राज्याचे विधान परिषदेचे माननीय सभापती राम शिंदे,विधान सभेचे आमदार रोहित दादा पवार तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि वरिष्ठ प्रशासनाचे लक्ष वेधले होते.वेळोवेळी लेखी अहवाल सादर करूनही संबंधितांवर कोणतीही शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात आली नाही.जेव्हा एखादा जबाबदार अधिकारी व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा त्याला संरक्षण देण्याऐवजी प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेमुळे डॉ.मोराळे यांचा भ्रमनिरास झाला.अखेर मानसिक क्लेश आणि कामातील वाढता हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी स्वेच्छेने बदलीचा पर्याय स्वीकारल्याचे बोलले जात आहे.
जामखेडकर तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत:- जामखेडच्या नागरिकांनी आता या प्रकरणात सभापती राम शिंदे,आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर,आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी केली असून सदर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदलीला तात्काळ वरिष्ठ पातळीवरून स्थगिती द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत.