अतिवृष्टीग्रस्त कर्जत – जामखेड मधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दिवाळीपूर्वीच थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात – सभापती प्रा.राम शिंदे
माहे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, बंधारे तुटले, घरांचे नुकसान झाले, आणि हजारो हेक्टर क्षेत्रातील उभे पीक पूर्णतः नष्ट झालेले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. शासनाने महसूल आणि कृषी विभागाला ही मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
या निर्णयाचा मोठा लाभ अहिल्यानगर जिल्ह्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांनाही मिळणार असून, कर्जत -जामखेडसाठी शासनाने एकूण १५८ कोटी ३१ लाख रुपयांचे भरीव अनुदान मंजूर झालेले आहे. अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
कर्जत तालुक्यासाठी ९९ कोटी ४३ लाख रुपये आणि जामखेड तालुक्यासाठी ५८ कोटी ८८ लाख रुपये असा निधी निश्चित करण्यात आला आहे. या अंतर्गत कर्जत तालुक्यातील ११९ गावे, ९९,९६१ शेतकरी आणि ६५,५७८ हेक्टर क्षेत्र, तसेच जामखेड तालुक्यातील ७७ गावे, ५७,५६६ शेतकरी आणि ५६,३१४ हेक्टर क्षेत्र या अंतर्गत समाविष्ट आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर महसूल आणि कृषी विभागांनी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनास प्रस्ताव पाठविला होता. शासनाने तत्परतेने निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या आर्थिक अडचणींना हातभार लागणार आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, “शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. दिवाळीपूर्वी ही मदत खात्यात जमा होणे म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. मी स्वतः अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या शासनापर्यंत पोहोचवलेल्या होत्या. त्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासनाने निधी मंजूर केला.” असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
या अनुदानाच्या अनुषंगाने सभापती प्रा.राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा मिळून शेती क्षेत्राला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी संघटना आणि कृषी संस्था यांनी व्यक्त केला असून त्याबद्दल त्यांनी सभापती प्रा.राम शिंदे यांचे आभार व्यक्त केले.