मानवाचे ताट जेव्हा विषमुक्त होईल, तो खरा माझा पुरस्कार – पद्मश्री राहीबाई पोपेरे बांधखडक शाळेत विविध प्रेरणादायी कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
मानवाचे ताट जेव्हा विषमुक्त होईल, तो खरा माझा पुरस्कार – पद्मश्री राहीबाई पोपेरे
बांधखडक शाळेत विविध प्रेरणादायी कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खते व कीटकनाशके यांचा भरमसाठ वापर आणि गावठी बियाणांऐवजी हायब्रीडचा वापर यांमुळे सुपिक असलेली काळी आई नापिक व कसहीन बनल्यामुळे आपले ताट सध्या विषयुक्त बनले आहे. त्याचा परिणाम आबालवृद्धांचे आरोग्य धोक्यात येण्यावर झाला आहे. आरोग्याच्या व कुपोषणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या असून सशक्त, बलवान व सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्व सुजाण नागरिकांसमोर आपल्या पाल्यांच्या पुढ्यातील ताट विषमुक्त करण्याचे खरे आव्हान असून मानव जेव्हा विषमुक्त अन्नाचे सेवन करून आरोग्यवान बनेल, तो खरा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असेल, असे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बांधखडक येथे शालेय ध्वजारोहण समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानातून केले.
पद्मश्री राहीबाई पोपेरे या बी.बी.सी.वर्ल्डने जाहीर करण्यात आलेल्या जगातील सर्वात प्रतिभावान व प्रेरणादायी अशा १०० महिलांपैकी एक असून भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नारीशक्ती तसेच पद्मश्री यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या त्या कोंभाळणेता.अकोले येथील बीजमाता म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत.
स्वतंत्र भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बांधखडक येथे शुक्रवार दि.१५ऑगस्ट २०२५ रोजी विविध प्रेरणादायी सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित सन २०२४-२५मध्ये विविध गुणदर्शन स्पर्धांतर्गत ‘कथाकथन’ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून जामखेड तालुक्याचे नाव उज्ज्वल केलेल्या कु.अक्षरा अमोल वारे या बांधखडक शाळेतील इ.५वीच्या विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांवरील डंबेल्स कवायत प्रकारांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, मिशन आरंभ, मंथन, बी.टी.एस.,एक्सलंट ऑलिंपियाड इ.विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा मानपत्र प्रदान करून शाळेतर्फे गौरव करण्यात आला. आदिनाथ वारे या विद्यार्थ्याने मानपत्राचे प्रभावी वाचन केले तर साईराज वारे या विद्यार्थ्याने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या जीवनावर आधारित कवितेचे सादरीकरण केले.स्वरा वारे, सिद्धी घोडके व संस्कृती वारे या विद्यार्थीनींनी प्रभावी भाषणे केली,तर सार्थक गिते(संत निवृत्तीनाथ),स्वप्निल फुंदे( संत ज्ञानेश्वर), रविराज वारे(संत सोपानदेव)व प्रतिष्ठा वारे(संत मुक्ताबाई) या विद्यार्थ्यांनी वेशभूषेसह प्रभावी सादरीकरण केले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील,बांधखडकचे विद्यमान सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तानाजी फुंदे माजी सरपंच केशव वनवे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय वारे, उपाध्यक्ष जयकुमार वारे शिक्षणप्रेमी नागरिक बाबा वारे, अण्णासाहेब वारे ,प्रभाकर वारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, तरूण बांधव,महिला, पालक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीचे औचित्य साधून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,तर कार्यक्रमानंतर प्रभावती वारे(आशा सेविका),संगीता वारे(अंगणवाडी सेविका), सविता वारे(अंगणवाडी मदतनीस), अर्चना वारे(सी .आर.पी.महिला बचत गट) व ज्योती वारे (माजी ग्रामपंचायत सदस्या) या पाच महिलांच्या वतीने सर्वांना अन्नदान करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक विकास सौने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला,तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांनी केले.