शासन कुणाचे ही असो मुंढेंची पारदर्शकता शिस्तीचा शाप की व्यवस्थेचा बळी ?”
धडाकेबाज, शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे 20 वर्षांत 24 बदल्या
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली झाली. गेल्या वीस वर्षांतील 24 वी बदली या आकड्यांकडे सहज नजर टाकली, तर वाटतं एखादा अधिकारी इतक्या वेळा का बदलीला सामोरा जातो? हा प्रश्न पडतो मात्र ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही. तर ही एका धडाकेबाज, कर्मठ आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्याच्या लढ्याची कथा आहे. आणि या लढ्याच्या पार्श्वभूमीला आहे, ही एक अशी व्यवस्था जी शिस्त, पारदर्शकता आणि कडकपणाच्या झळा सहन करू शकत नाही अशी तुकाराम मुंढे म्हणजे कायद्यानं चालणाऱ्या व्यवस्थेचा चेहरा असून त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे शिस्त आणली, भ्रष्टाचाराला वेसण घातली, आणि जनतेच्या हक्कासाठी प्रशासनाला आरसा दाखवत आली.
पण हे करत असताना त्यांच्या कडव्या शैलीतून अनेकांचा अहंकार दुखावला गेला, लोकप्रतिनिधींशी वाद झाले, स्थानिक राजकारणाशी उभा-आडवा लागला आणि प्रत्येक वेळी त्यांची बदली ‘प्रशासकीय गरज’ म्हणून लपवण्यात आली हे तितकेच खरे,
या वेळी तर त्यांच्या बदलीचा प्रवास अधिकच धक्कादायक झालाय. नागरी आयुक्त, कामगार विभाग आदी जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांची नियुक्ती ‘दिव्यांग कल्याण विभाग सचिव’ या पदावर करण्यात आली.
एक महत्त्वपूर्ण पण व्यवस्थेत दुय्यम मानलं जाणारं पदी हे केवळ ‘शिस्तीचा पुरस्कार’ करणाऱ्याची ‘शिस्तीत’ बदली आहे, का व्यवस्थेच्या डोळ्यांत खुपणाऱ्या एका अधिकाऱ्याला ‘साइडलाईन’ करण्याचा प्रयत्न केला? या साऱ्या घडामोडीवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की महाराष्ट्राला आणि देशालाही अजूनही “तुकाराम मुंढे” हवेत. पण व्यवस्थेला त्यांची गरज नसावी, असंच चित्र निर्माण केलं जातय. कारण ही व्यवस्था अजूनही ‘मिळवून घ्या, जुळून घ्या’ या धोरणावर चालत आहे. जो अधिकारी सरळ रेषेत चालतो, तो व्यवस्थेचा बळी ठरतो हे नक्की, आणि जो वाकतो, तो टिकतो.
प्रश्न हा आहे की, आपल्या लोकशाहीत ताठ मानेनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण कितपत साथ देतो हे महत्त्वाचे, सोशल मीडियावर त्यांचं कौतुक केल्याने व्यवस्थेत काही बदलणार आहे का? की पुन्हा एकदा ही चर्चा विसरून जाऊ. आणि काही महिन्यांत पुन्हा त्यांच्या नव्या बदलीची बातमी येईल?
तुकाराम मुंढे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाहीत तर ते एका प्रशासकीय मूल्यव्यवस्थेचं प्रतीक आहेत. आणि जर त्यांच्यासारखे अधिकारी टिकू शकत नसतील, तर आपल्याला खरंच आत्मपरीक्षणाची गरज आहे असे वाटते.
तुकाराम मुंढेंच्या बदल्या
ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी, सोलापूर
सप्टेंबर 2007 – उपजिल्हाधिकारी, देगलूर
जानेवारी 2008 – जिल्हा परिषद सीईओ, नागपूर
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग, नाशिक
जुलै 2009 – सीईओ, वाशिम
जून 2010 – सीईओ, कल्याण
2011 – जिल्हाधिकारी, जालना
2011–12 – जिल्हाधिकारी, सोलापूर
2012 – सहआयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई
नोव्हेंबर 2014 – जिल्हाधिकारी, सोलापूर (दुसरी वेळ)
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, PMPL, पुणे
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय
डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी 2021 – पदाधिकारी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत
सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
एप्रिल 2023 – सचिव, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
जून 2023 – सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
जून 2024 – विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई
5 ऑगस्ट 2025 – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.