Wednesday, March 11, 2026
Home ताज्या बातम्या कुंभमेळ्यात कोरोनाच्या बनावट चाचण्या, बोगस बिले काढली ईडीच्या छाप्यात बाब उघड

कुंभमेळ्यात कोरोनाच्या बनावट चाचण्या, बोगस बिले काढली ईडीच्या छाप्यात बाब उघड

0
357
जामखेड न्युज – – – 
 कुंभमेळ्याच्या काळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून चाचण्या केल्याशिवाय प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी केंद्र सरकारने प्रयोगशाळांना कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे कंत्राट दिले होते; मात्र या प्रयोगशाळांनी प्रत्यक्षात कोरोनाच्याअगदीच कमी चाचण्या केल्या; पण चाचण्या केल्याच्या खोट्या नोंदी करून बोगस बिले काढली. ‘ईडी’ च्या छाप्यात ही बाब उघडकीस आली होती.
बनावट चाचण्यांचे आरोप
ऐन करोनाच्या काळात दुसरी लाट सुरू असताना देशात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यावर मोठ्या प्रमाणार टीका केली गेली; मात्र त्यामध्ये कोरोना लसीकरण आणि इतर नियमांची योग्य ती काळजी घेतली गेल्याचं सांगितलं गेलं; परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या बनावट चाचण्या करण्यात आल्याचे आरोप झाल्यानंतर शुक्रवारी ‘ईडी’ने या प्रकारामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील अनेक प्रयोगशाळांमध्ये छापे टाकले.
दिल्ली, हरिद्वार, डेहराडून, नोएडामध्ये छापे!
‘ईडी’ने या चारही राज्यांमधील प्रयोगशाळांवर छापे टाकले. यात नोव्हस पॅथ लॅब्स, डीएनए लॅब्ज, मॅक्स कॉर्पोरेट सर्विसेस, डॉ. लाल चंदानी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नालवा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिडेट यांचा समावेश आहे. दिल्ली, हरिद्वार, डेहराडून, नोएडा आणि हिसार या ठिकाणी या लॅब्जच्या संचालकांच्या घरी ‘ईडी’ने छापेमारी केली आहे.
काय होती मोडस ऑपरेंडी?
उत्तराखंडच्या महसूल खात्याने या चाचण्यांसाठी संबंधित खात्याला तब्बल तीन कोटी चार लाख रुपयांचा निधी दिला आहे. अनेक लोकांसाठी या लॅब्ज एकच बनावट पत्ता किंवा एकच खोटा मोबाईल क्रमांक वापरत असत. हीच माहिती या लोकांच्या स्पेशिमन रेफरल फार्ममध्ये भरली जायची. असे करून प्रत्यक्षात चाचणी न करताच मोठ्या संख्येने चाचणी केल्याचे या प्रयोगशाळा दाखवित होत्या.
कुंभमेळ्याकडे न फिरकणा-यांच्या चाचण्या!
ज्या लोकांनी कधीच कुंभमेळ्याला भेट दिलेली नाही, अशा लोकांच्या चाचण्या केल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रयोगशाळांना केलेल्या खोट्या चाचण्यांमुळे कुंभमेळ्याच्या वेळी हरिद्वारमधला पाॅझिटीव्हिटी रेट ०.१८ टक्के दाखवला गेला; मात्र प्रत्यक्षात तो ५.३ टक्के होता. या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणवार बनावट कागदपत्र, बोगस बिले, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि मालमत्तेसंबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!