जामखेड न्युज – – –
मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आला. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता ही शोधमोहीम सुरू करण्यात आली.
फोन करणा-याचा शोध सुरू
ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता, त्याला परत फोन केल्यानंतर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं ती व्यक्ती म्हणाली. त्यानंतर त्यानं आपला फोन बंद करून ठेवला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यास अडचण येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
स्फोटक वस्तू सापडली नाही
रेल्वे विभागाला एक निनावी फोन आला. त्या व्यक्तीने सीएसएमटी, दादर, भायखळा, आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणांवर दाखल झालं; मात्र अद्याप कोणतीही स्फोटक वस्तू दिसून आलेली नाही.
सीएसएमटी स्थानकावर कसून शोधमोहीम
बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सीएसएमसी स्थानकावर बाँब शोधक पथक तातडीने दाखल झालं. यामुळे रेल्वे स्थानकावर काही काळ खळबळ उडाली होती. मेन लाईन आणि वेटिंग हॉल रिकामा करण्यात आला. तसंच स्थानकावर सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉल यापासून तिकीट घर अशा सर्व ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी काय म्हणाले ?
मला जीआरपीच्या माध्यमातून माहिती मिळाली. जशी माहिती मिळाली, तशी ती रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला कळवण्यात आली. त्यानंतर लगेच बॉम्प स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. यामध्ये प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तसेच या फोनमध्ये किती तथ्यता आहे, तेही तपासले जात आहे. सध्यातरी फोन कॉलमध्ये जे सांगण्यात आले आहे, त्यानुसार काहीही सापडलेले नाही.






