पुस्तकांची आवड माणसाला समृद्ध बनवते – अध्यक्ष उध्दवबापू देशमुख
यशस्वी माणसाला समृद्ध करणारा ठेवा म्हणजे पुस्तक होय. ग्रंथमैत्री माणसाला यशस्वी करते आणि आनंदी सुध्दा बनवते. फक्त विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक, कर्मचारी आणि सर्वच नागरिकांनी आयुष्यभर पुस्तकांची सोबत जपली पाहिजे. असे मार्मिक प्रतिपादन दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उध्दवबापू देशमुख यांनी केले. जामखेड महाविद्यालयातील ‘पुस्तक आपल्या भेटीला’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जामखेड महाविद्यालयात आषाढी वारी निमित्ताने ‘पुस्तक माझा पांडुरंग’ ही मोहिम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ‘पुस्तक आपल्या भेटीला’ या उपक्रमाचे उद्घाटन मा. उध्दवबापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव मा. अरुणशेठ चिंतामणी, मा. दिपककाका होशिंग, डॉ. कटारिया, मा. शशिकांत देशमुख, इत्यादी मान्यवर उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे माजी सचिव मा. शशिकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तकप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या ज्ञानसाधनेच्या बळावर देशातील प्रमुख राजनेता बनली. यामागे त्यांचे पुस्तकप्रेम आणि अभ्यासातील सातत्य महत्वपूर्ण ठरले आहे. आपणही पुस्तकांचे महत्व जाणून जीवन घडवावे असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल पुराणे यांच्या कल्पनेतून आणि ग्रंथालय विभागाचे पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.
निवडक पुस्तकांच्या प्रदर्शनात विश्वकोश, ज्ञानकोश, ब्रिटानिका, भारतीय संविधान, पौराणिक ग्रंथ, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, महात्मा फुले, अब्दुल कलाम अशा अनेक दुर्मिळ तसेच महान कलाकृती, ग्रंथसंपदा सर्वांना अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहेत.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल पुराणे, उपप्राचार्य डॉ. नरके, ग्रंथपाल संजय माने, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी ग्रंथपाल संजय माने, राजकुमार सदाफुले, सुनील होशिंग, अनिकेत देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यासोबतच क्रिडा संचालक डॉ आण्णा मोहिते, वाङमय मंडळ, भाषा विभाग, एन. एस. एस., एन. सी. सी. यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
हा उपक्रम सात दिवस सुरू राहणार असून जामखेड परिसरातील ग्रंथप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ पुराणे यांनी केले आहे.