जामखेड शहरात अनेक भागात घराभोवती तळे, नगरपरिषद म्हणजे असून अडचण नसून खोळंबा
गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे जामखेड शहरात अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले तर नगरपरिषद शाँपिंग सेंटर गाळ्यातील छत कोसळून दुकानदारांचे नुकसान झाले आहे. नगरपरिषद म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी काढण्याचे कसलेही नियोजन नाही यामुळे अनेकांच्या घराभोवती तळे साचलेले आहे घरात जाण्यासाठी रस्ताच नाही. अशी परिस्थिती शहरातील अनेक भागात आहे.
जामखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेती आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटून शेतीची माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. तर फळपीक भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरात घरात व दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. खर्डा, जवळा, नान्नज, बावी, हळगाव, शिऊर, मतेवाडी, लोणी, साकत, बांधखडक, पिंपरखेड, फकराबाद, राजूरी यासह अनेक गावातील फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कांदा, आंबा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील काही ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरल्याने त्यांच्या संसारोपयोगी वस्तूंना मोठे नुकसान झाल्याचे सांगितले आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती भागात रात्रीच्या जोरदार पावसामुळे अनेक आडत दुकानात पाणी शिरले होते. पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्याने अनेकांच्या दुकानात पाणी शिरले.
शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर, संभाजीनगर, विद्यानगर, साईनगरपरिसरात अनेक बंगल्याभोवती तळे साचलेले होते. तर अनेक भागात घराकडे जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही रस्त्यावर तळे साचलेले आहे.
मराठी शाळेपाठीमागील भागात जाण्यासाठी नीट रस्ता नाही तसेच रस्त्यावर तळे साचलेले असते. अनेक घराभोवती तळे साचलेले होते. घरात जाण्यासाठी रस्ताच नसतो. याबाबत नागरिकांच्या मते नगरपरिषद म्हणजे फक्त कर वसुलीसाठी येते आम्हाला कसल्याही सुविधा नाहीत. नीट रस्ता नाही, पावसाचे पाणी जाण्यासाठी जागाच नाही.