100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम, विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर

0
288

जामखेड न्युज——-

100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम, विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर या दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याबाबत सूतोवाच केले. त्याचा तपशील उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

त्यांनी सांगितले की, शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील सुमारे १२,५०० शासकीय कार्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली. मंत्रालयातील ४८ विभाग या कार्यक्रमात सहभागी झाले. या विभागातील ९०२ विषयांवर धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना ७०६ विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक बदल करण्यात आले. यामध्ये काही धोरणात्मक बदल करण्यात आले तर काही प्रक्रियात्मक बदल करण्यात आले. या कार्यक्रमास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.

विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर हा कार्यक्रम आधारित असेल. विकसित महाराष्ट्र मुद्यांवर २०२९, २०३५ आणि २०४७ अशा तीन टप्प्यांत विभागाचे धोरण काय असेल याबाबत परिमाण निश्चित करण्याचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतून प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न झाले. आता नागरिकांना आधिक चांगली सेवा देण्यासाठी हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उस्फुर्त सहभाग दाखविल्याबद्दल सर्व मंत्री आणि सचिव यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here