जामखेड न्युज ——
चौंडी मंत्रीमंडळ बैठकीत अनेक ऐतिहासिक निर्णय पण कुकडी पाणी प्रश्न व औद्योगिक वसाहतीला बगल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त राज्य सरकारने चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे. यामध्ये विविध ठिकाणच्या विकास आराखड्यासाठी 5503 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला. यामध्ये चौंडी जन्मस्थळी स्मृतिस्थळ विकसित करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले पण कर्जत जामखेड च्या ज्वलंत कुकडी पाणी व औद्योगिक वसाहत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा प्रश्न तसाच ताटकळत राहिला.
विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून आज मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर नंतर आज इतिहासात प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, परकीय आक्रमणांमुळे नष्ट झालेल्या श्रद्धास्थानांचे पुनरुत्थान करण्याचे कार्य अहिल्यादेवींनी केलं. त्याच धर्तीवर त्यांच्या जन्मस्थळी स्मृतिस्थळ विकसित करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अष्टविनायक मंदिरासाठी 147 कोटी
तुळजापूर मंदिरासाठी 1865 कोटी, ज्योतीबा मंदिरासाठी 259,त्रिंबकेश्वर मंदिरासाठी 275,
महालक्ष्मी मंदिरासाठी 1485 व माहुरगड मंदिरासाठी 829 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक चित्रपट निर्मिती करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून तो मराठी सह हिंदी व अन्य भाषांमध्ये तयार केला जाणार आहे.
या बैठकीत अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय झाला असून त्याचे नाव “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय” असेल. यासोबतच ‘आदिशक्ती अभियान’ राबवून महिला सक्षमीकरणासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.
धनगर समाजासाठी यशवंत विद्यार्थी योजना सुरु करण्यात येणार असून 10 वी नंतर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील नामांकित शाळांमध्ये शिक्षणाची संधी दिली जाणार आहे. तसेच, वस्तीगृह योजना नव्याने सुरु करण्यात येत असून नागपूर व पुढे येथे लवकरच होस्टेलचे काम सुरू होणार आहे.
जलसंधारण विभागाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे संवर्धन करण्यासाठी विशेष मोहिम सुरु केली जाणार आहे. यामध्ये चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हारगड, गौतमेश्वर व जेजुरीसह अनेक ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश आहे.
याशिवाय, त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला असून, स्मृतीशताब्दीचा लोगो आणि डाग तिकीट देखील प्रकाशित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाज, संस्कृती आणि धर्माला पुनर्स्थापित करण्याचं काम केलं. म्हणूनच त्यांच्या शताब्दीनिमित्त ही महत्त्वपूर्ण बैठक चोंडी येथे घेण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही याच ठिकाणी जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे ठरविले होते आणि ते केलेही. शालेय अभ्यासक्रमात अहिल्यादेवी यांच्या कार्याचा विस्तृत इतिहास घेण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, सर्व मंत्रीमंडळाच्या सहमतीने आम्ही हे विकासाचे निर्णय घेतले आहेत.