- जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. यासाठी. 1302 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील 44 उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले त्यामुळे सध्या 1268 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. बाकी 44 ग्रामपंचायती साठी निवडणूक होत आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा प्रचारात रंगत येऊ लागली आहे. गावकीच्या अन भावकीच्या लढाईचे चित्र दिसत समाजमाध्यमावर दिसत आहे. गावाकडील गृपवर निवडणुकीचा धुराळा दिसत आहे. सोशल मिडीयावर आॅडिओ व व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. ” आपल्या हक्काचा माणूस”
” आता नाही तर कधीच नाही”
” भावी सरपंच”
” पैसा त्यांचा घ्या मत आम्हाला द्या”
अशा क्लिप व्हायरल होत आहेत. कडक खादीच्या कपड्यातील उमेदवार रामराम, जय हरी, नमस्कार, जेष्ठाच्या पाया पडणे हे सर्रास सुरू आहे.
निवडणुकीमुळे अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना आता सोन्याचे दिवस आले आहेत. कारण निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवार आपल्या लवाजम्यासह गावातील लग्न, वाढदिवस, अंत्यसंस्कार, धार्मिक विधी या सर्व कार्यक्रमासाठी न चुकता हजेरी लावत आहेत. सध्या अडगळीतील कार्यकर्त्यांचाही वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जात आहे.
सध्या थंडीचे दिवस आहेत तरीही निवडणुकीमुळे गरमागरम वातावरण निर्माण झाले आहे.
मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा आता विसर पडलेला दिसतो आहे व नविन आश्वासनाचे स्वप्न दाखवले जात आहे.
*भावकीची मिटिंग घेऊन गुलाल उचलण्याचे कार्यक्रम सुरू*
निवडणूकीच्या निमित्ताने मागिल पाच वर्षांतील राग लोभ विसरून सर्व भावकिला एकत्र आणून चर्चा करून एखाद्या उमेदवाराच्या मागे उभे राहण्यासाठी ग्रामदैवताच्या नावाने गुलाल, भंडारा उचलला जात आहे. सध्या अनेक ठिकाणी हे फॅड सुरू झाले आहे. तसेच धाबा संस्कृती वाढीस लागली आहे. भावकीच्या लोकांना एकत्र घेऊन हाॅटेल व धाब्यावर खाणे पिणे सुरू झाले आहे.
*गाव पुढारी कडक खादीत पण, गावातील हागणदारी उघडवरच*
सध्या गावा गावात जिल्हा परिषदेमार्फत हागणदारी मुक्त गावात आपले सहर्ष स्वागत असे फलक लावलेले दिसत आहेत. पण अनेक गावात रस्त्याच्याकडेने नाक दाबून चालावे लागत आहे. कोटय़वधी रुपयांचा अनुदानातून गावातील अनेकांनी संडास बांधलेले आहेत पण तरीही लोक उघड्यावर शौचास जाताना दिसत नाही. या गावातील घाणीबद्दल गाव पुढाऱ्यांना कसलेही देणेघेणे नाही. सध्या थंडीतही गरमागरम वातावरण निर्माण झाले आहे.
*निवडणूक खर्च फक्त दाखवण्यासाठी प्रत्यक्षात कितीतरी पटीने अधिक खर्च*
सध्या निवडणुकीत सात ते नऊ सदस्यांसाठी पंचवीस हजार रुपये, 11 ते 13 सदस्यांसाठी 35 हजार रुपये तर 15 ते 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींसाठी 50 हजार रुपये सदस्याला खर्च मर्यादा आहे. हा फक्त दाखवण्यासाठी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे एका एका दिवसाचे धाब्यावर बील पन्नास हजार रुपये होते तसेच मोठय़ा प्रमाणावर पैशाचे व्यवहार होतात वाटप होते हा खर्च कोठेही कागदावर येत नाही. असे खर्च करणार्यांवर निवडणूक आयोग कधी कारवाई करणार हा संशोधनाचा विषय आहे.