९ मार्च हुतात्मा दिन साजरा खर्डा येथील कॉ. मुरलीधर गोलेकर यांना हौतात्म्य

0
259

जामखेड न्युज——

९ मार्च हुतात्मा दिन साजरा

खर्डा येथील कॉ. मुरलीधर गोलेकर यांना हौतात्म्य

तब्बल ७५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात उभारलेल्या लढ्यात पोलिसांनी गोळीबार केला व त्यात खर्डा, ता.जामखेड येथील मुरलीधर गजानन गोलेकर यांच्यासह आणखी दोन शेतकऱ्यांनी बलिदान दिले होते. त्यावेळी राजापूर ग्रामस्थांनी या तिन्ही हुतात्म्यांची आठवण जपण्यासाठी उभारलेले ‘हुतात्मा स्मारक’ आजही दिमाखात उभे असून या ठिकाणी ९ मार्च हा ‘हुतात्मा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

खर्डा येथील तत्कालीन तालुका मास्तर गजानन गोलेकर यांचे सुपुत्र मुरलीधर गोलेकर हे सधन कुटुंबातील असल्याने त्यांना पुढील शिक्षणासाठी अहिल्यानगर येथे पाठवण्यात आले. तेथेच त्यांचा किसान सभा तसेच कम्युनिस्ट विचारांची परिचय झाला. कै.ॲड.नितीन गोलेकर व खर्डा सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजेंद्र गोलेकर यांचे ते चुलते होते.

दरम्यान १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्व राज्यात स्थानिक राज्य सरकारे स्थापन झाली. १९५० साली महाराष्ट्र सरकारने दुष्काळ असल्याने सक्तीची धान्य लेव्ही बसवली. मुळात शेतकऱ्यांकडे धान्य नसल्याने लेव्ही कुठून देणार असा प्रश्न असल्याने शेतकरी वर्ग अतिशय संतप्त झाला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे धान्य ही कुणी बळजबरीने घेऊन जाणार असेल तर खायचे काय असा बिकट प्रश्न उद्भवल्यामुळे महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वाखाली सक्तीच्या लेव्ही धोरणाच्या विरोधात आंदोलने सुरू झाली.

कॉ. सहाने मास्तर, कॉ‌ रामभाऊ नागरे, कॉ. विष्णू भिवाजी हासे, कॉ. दगडू मनाजी हासे यांच्या नेतृत्वाखाली राजापूर येथे ९ मार्च १९५० रोजी शेतकरी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयीन युवक असलेल्या, अविवाहित मुरलीधर गोलेकर यांनीही सहभाग घेतला.

आदल्या दिवशी ८ मार्च १९५० च्या रात्री पोलिसांनी गावाला वेढा देत प्रचंड दहशत निर्माण केली. तरीही संयोजकांनी आणि कार्यकर्त्यांनी किसान परिषदेचे कामकाज सुरू ठेवले. शेतकऱ्यांच्या घरातून जमा केलेले धान्य बैलगाड्यातून तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाण्याची तयारी झाली. आंदोलकांनी विरोध करताच त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये खर्डा येथील कॉ. मुरलीधर गोलेकर यांच्यासह अहमदनगर येथील कॉ. मारुती गायकवाड, राजापूर येथील कॉ. काशिनाथ कदम यांना हौतात्म्य आले.

पुढे पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांना अटक करत खटला दाखल केला. यामध्ये त्यांना नऊ महिन्यांची शिक्षाही झाली. शिक्षा भोगून आल्यावर १९५१ साली सरकारकडे जमा असलेला राजापूरचा नऊ हजार रुपयांचा ‘कम्युनिस्ट फंड’ मिळवून घेत राजापूर येथे ‘हुतात्मा स्मारक’ बांधण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करत शाळेच्या खोल्या ही बांधल्या.

हुतात्मा मुरलीधर गोलेकर यांचा अंत्यविधी देखील राजापूर येथेच करण्यात आला व त्यांचे कपडे मात्र खर्डा येथील त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते.

शेतकरी संघटित झाला तर सरकारी अन्यायाविरुद्ध संघर्ष करून, क्रांतीलढा उभारुन न्याय मिळवू शकतो ही प्रेरणा राजापूरचे आंदोलन देते. आजही सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांकडून या लढ्यातील हुतात्म्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख होतो.

मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा गौरवशाली इतिहास असलेली खर्डा नगरी ही वीरांची भूमी असून येथील मातीतच लढाऊ बाणा असल्याचे प्रमाण हा इतिहास देतो.

चौकट-
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे हे नुकतेच खर्डा दौऱ्यावर आले असता हुतात्मा मुरलीधर गोलेकर यांचे पुतणे खर्डा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गोलेकर यांनी या लढ्याचे त्यांना स्मरण करून दिले. आ.सत्यजित तांबे यांनी स्वतः स्मारकाचे फोटो व थोडी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांना पाठवली. त्यातून ही प्रेरणादायी बातमी वाचकांसमोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here