सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. हे फोटो बघून हैवानाचाही थरकाप उडेल अशा क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो सीआयडीच्या हाती आले आहेत. हे व्हिडिओ व फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात संतापाची लाट निर्माण होईल. त्यामुळे आता सरकारने यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मीक कराड हा संतोष संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मुख्य आरोपी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
हरामखोरांवर काय कारवाई करणार? – धनंजय देशमुख
माझ्या भावाला तीन तास मारहाण होत होती आणि त्या हरामखोर आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांनी आमची दिशाभूल केली. माझ्या भावाला झालेली भयावह मारहाण पाहून काळीज हेलावून गेले आहे, खूप वेदना होत आहेत, अशी पहिली प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. माझ्या भावाला खूप वेदना दिल्या गेल्या, आता त्या हरामखोरांवर काय कारवाई करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
माझ्या लेकरांना काय सांगणार
धनंजय देशमुख म्हणाले, पैशाच्या हव्यासापोटी ते काय करू शकतात हे सगळ्यांना माहिती होते. तरीही त्या आरोपींचे समर्थन केले जात होते याची चीड येत होती. मी आतापर्यंत संयमाने बोलत होतो, कारण आपल्या हाती काही नाही हे मला माहिती होते. आता जे काही समोर आले त्यामुळे भयंकर वाटत आहे. माझ्या भावाला खूप त्रास दिला. मला ते पाहून काहीच कळत नाही. माझ्या लेकरांना काय सांगणार याची चिंता आहे.
पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, वाल्मीक कराडने त्यांना सांगितले होते की संतोष देशमुखला मारून टाका. त्यामुळे या आरोपींना काहीच भीती नव्हती. त्या पोलिस यंत्रणांनी त्यांना पोसले होते. पोलिसांनी आमची दिशाभूल केली, आम्हाला दुसरीकडे पाठवले. तीन तास मारहाण होत होती. राष्ट्रवादी पक्षाचे ऑफिस हे गुन्हेगारांचे ऑफिस होते. त्या ठिकाणी ते हरामखोर बसायचे.पोलिस यंत्रणेला माहिती होते की ते सराईत गुन्हेगार आहेत.
आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर सेल्फी घेताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले आहेत. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे.
आरोपींनी पाईपला करदोड्याने मूठ तयार करून देशमुख यांना मारहाण करण्यात केल्याच्या या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. तसेच एका लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली हे पुरावे सीआयडीने आरोप पत्रात नमूद केले आहे. यामध्ये 66 भक्कम पुरावे जप्त केले असून 184 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले तर पाच गोपनीय साक्षीदारही महत्त्वाचे ठरले आहेत. सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळले. या प्रकरणात फोनवरून संभाषण झालेली ऑडिओ क्लिप आणि देशमुख यांना मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप जप्त करण्यात आली आहे.
अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया
अंजली दमानिया यावर प्रतिक्रिया देताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले, धनंजय मुंडे खड्ड्यात जाऊ दे. या माणसाने असे प्रकार करू दिले. गेली 10 वर्षे असे गुन्हे चालू दिले आहेत. कोर्टाच्या ऑर्डर आल्या तरी देखील पोलिस तक्रार घेत नव्हते. हे सगळे फोटो व्हिडिओ बघून मनाचा थरकाप उडाला आहे. मनाला यातना होत आहेत. देशमुख कुटुंबीयांवर काय बेतली असेल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. इतक्या अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. मारहाण करताना हे हासतान दिसतात, यांच्यात जरा तरी माणुसकी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, सकाळी मी धनंजयशी बोलले तर ते म्हणाले ते ताई फोटो पाहणार नाही. तो माझा दादा होता. माय ब्रदर माय लाईफ, अशा नावाने त्याने संतोष देशमुखांचा फोन नंबर सेव्ह केला होता. एवढे होऊन पण वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट देण्याची हिंमत होते. वाल्मीक कराडला जमिनीवर झोपवले पाहिजे. स्पेशल जेवण, स्पेशल चहा मिळतो. दोन-दोन तास व्हिडीओ कॉलवर बोलतो. हे काय चालले आहे? माझी पहिल्या दिवसापासून मागणी होती की वाल्मीक कराडला ऑर्थर रोड जेलमध्ये हलवा.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाड म्हणाले, अशा प्रकारे परळीत अनेक हत्या झाल्या आहेत. जे कधी रजिस्टर झाले नाहीत आणि पोलिसांनी कधी लक्षही दिलेलो नाही. जो चौकशी आयोग नेमलेला आहे. त्याचा परीघ वाढवला पाहिजे. महादेव मुंडेंच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी उपोषणाला बसली आहे. तिच्या बाजूला दोन छोटे मुले बसलेले आहेत. आम्ही मी आणि सुप्रियाताई भेटायला गेलो होतो. त्यामुळे दोन्ही मुले प्रचंड रडत होती. आपल्याच मनात कालवाकालव होती. आपण अशांना न्याय देऊ शकत नसेल तर काय उपयोग आपल्या कामाचा. कलेक्टर, पोलिस यंत्रणा सर्व धनंजय मुंडेंची मग कारवाई कशी होणार आहे?
मनोज जरांगे यांची संतप्त प्रतिक्रिया
मनोज जरांगे म्हणाले की, “धनंजय मुंडे यांच्यावर जर भगवानबाबांचे संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार असतील तर मनाने आमदारकीसह सर्व पदांचा राजीनामा द्यावा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी जाऊन राजीनामा दे. तू स्वतःहून जेलमध्ये जा. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंना लाथ मारून बाहेर काढावे. असे जर केले नाही तर थू तुमच्या जिंदगीवर. किती क्रूरपणे एखाद्याला मारले गेले हे समोर आले. देखमुखांच्या पत्नीला, मुलांना, कुटुंबीयांना काय वाटत असेल. यापुढे आपला मोर्चा हा धनंजय मुंडेच्या टोळीकडे असणार आहे. अजित पवारांचे नाव या आधी आपण कधी घेतले नाही. पण आता पहिल्यांदा सांगतोय. मुंडेला बाहेर काढले नाही तर तुम्हाला भोगावे लागणार आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.