शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही – संचालक सचिन घुमरे
जिल्हा बँकेच्या सर्व शाखांचा घेतला आढावा, कामकाज गतिमान, पारदर्शक करण्याचा निर्धार
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सचिन (नाना) घुमरे यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी जामखेड तालुक्यातील जिल्हा बँकेच्या सर्व शाखांतील कर्मचारी आणि विविध सोसायट्यांच्या सचिवांची संयुक्त बैठक घेऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी कर्मचारी व सचिवांच्या अडचणी जाणून घेत बँकेचे कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि शेतकरीहिताचे करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हा बँकेत येणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होता कामा नये. प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानपूर्वक आणि सुलभ सेवा मिळाली पाहिजे. सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन लोकाभिमुख कामकाज करावे, अशा स्पष्ट सूचना घुमरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
सभापती प्रा. राम शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवणार! लोकनेते तथा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा निर्धार सचिन घुमरे यांनी व्यक्त केला.
घुमरे यांच्या पहिल्याच बैठकीतील स्पष्ट भूमिकेमुळे जामखेडच्या सहकार क्षेत्रात त्यांच्या कामकाजाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत.