जामखेड न्युज——
प्रा.डॉ. सुनिल नरके यांचा महाराष्ट्र भूगोलशास्त्र आदर्श अध्यापक पुरस्काराने गौरव
जामखेडच्या भुमीपुत्राचा राज्यस्तरावर झेंडा
जामखेड महाविद्यालयातील उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल नरके यांना नुकताच महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेचा मानाचा आदर्श अध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामुळे जामखेडच्या ज्ञानक्षेत्रात एका नावलौकिकाचा झेंडा रोवला गेला आहे.
दरवर्षी महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद, पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श अध्यापक पुरस्कार देण्यात येत असतो. यासाठी पुरस्कार निवड समिती विविध शैक्षणिक गोष्टी विचारत घेत असते.
प्रा. डॉ. सुनिल नरके यांचे छतीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी बत्तीस क्रमिक पुस्तके लिहिली आहेत, लघु संशोधन पेपर, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभाग, विद्यापीठ अभ्यास मंडळ व महाविद्यालयातील योगदान या सर्व बाबींचा विचार करून. निवड समितीने २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात प्रा.डॉ. सुनिल युवराज नरके, जामखेड महाविद्यालय, जामखेड यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
अक्कलकोट येथील खेडगी महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे’ कुलगुरू मा. डॉ. प्रकाश महाणवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी डॉ. प्रवीण सप्तर्षी, डॉ.ज्योतिराम मोरे, प्राचार्य ए. सी. अडवीतोट, भूगोल अभ्यास मंडळ अध्यक्ष प्राचार्य अर्जुन मुसमाडे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.
या पुरस्काराने महाविद्यालयाच्या आणि जामखेड तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. या गौरवाबद्दल सर्व स्तरातून प्रा. सुनिल नरके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुण (काका) चिंतामणी , सचिव मा. शशिकांत देशमुख, सहसचिव मा.दिलीप गुगळे, खजिनदार मा. राजेश मोरे, ज्येष्ठ संचालक मा. अशोक(शेठ) शिंगवी यांनी अभिनंदन केले आहे.