जामखेड न्युज – – –
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या अर्जेटिनाला साखळी फेरीमधील सामन्यात धूळ चारली आहे. भारताने अर्जेंटीनाविरुद्धचा सामना ३-१ च्या फरकाने जिंकला आहे. या विजयासोबतच भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भारताने आपल्या चौथ्या सामन्यामध्ये २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्जेंटिनाच्या संघावर ३-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे.
*पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत*
या सामन्यामध्ये भारत आणि अर्जेंटिना दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्येही एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते. पहिल्या ३० मिनिटांमध्ये एकाही संघाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली नाही.
*पेनल्टी कॉर्नरवर भारताचा पहिला गोल*
सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरच वरुण कुमारने भारताकडून पहिला गोल करत सामन्यात भारतीय संघाला १-० ची आघाडी मिळवून दिली. अर्जेंटीनाने चौथ्या क्वार्टरमध्ये सामन्यामध्ये आपला पहिला गोल केला. ४८ व्या मिनिटाला मश्को स्कूथने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना १-१ च्या बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघ अगदीच आक्रमक पद्धतीने खेळ करताना दिसले.
*अन्…भारताचा थरारक विजय*
भारताकडून ५८ व्या मिनिटाला विवेक सागरने गोल करत भारताला २-१ ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या ५९ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताची आघाडी ३-१ वर नेली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताला या सामन्यात एकूण ८ कॉर्नर मिळाले. त्यापैकी दोनमध्ये भारताला गोल करण्यात यश आलं.
*चार पैकी तीन सामन्यात विजय*
भारताने आपल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंड, स्पेन आणि अर्जेंटीनाला धूळ चारली आहे. भारताला या स्पर्धेमध्ये केवळ ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं आहे. अ गटाच्या अंतिम सामन्यामध्ये भारत ३० जुलै रोजी जपानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.