जामखेड येथे एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पुढील आठवड्यात
कवीवर्य कै. आ.य.पवार यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठी साहित्य प्रतिष्ठान, जामखेडच्या वतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन गुरुवार दि. 6/02/ 2025 रोजी जामखेड येथे आयोजित केले असून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी मा. विजयकुमार मिठे हे भूषविणार आहेत.मराठी साहित्य प्रतिष्ठानचे हे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आहे.साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा.ना.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य मा.प्रकाश होळकर व डॉ.राजेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती संमलनाचे स्वागताध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात यांनी दिली.
एक दिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ पुरस्कार वितरण, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवारी सकाळी ८.०० वा. संमेलनाध्यक्ष मा.विजयकुमार मिठे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. “मराठी भाषा व आजची सद्यस्थिती” या विषयावरील परिसंवादामध्ये डॉ. विजय जाधव, डॉ.किसन माने व डॉ.सुधाकर शेलार सहभागी होणार असून परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.फुला बागुल असतील तर प्रमुख उपस्थिती दै.लोकमतचे संपादक मा.सुधीर लंके यांची असणार आहे.
दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध चित्रपट गीतकार मा.बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत असून त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. ग्रंथ पुरस्कार वितरणामध्ये छत्रपती राजे संभाजी साहित्य पुरस्कार देऊन मान्यवर साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे.ग्रंथ पुरस्कार वितरण विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच यावर्षी पासून दिला जाणारा कवीवर्य आ.य.पवार सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह साहित्य पुरस्कार प्रसिद्ध चित्रपट गीतकार मा. बाबासाहेब सौदागर यांच्या “मृगपक्षी” या काव्यसंग्रहाला देण्यात येणार असल्याची माहिती अवधूत पवार यांनी दिली. सायंकाळी सुप्रसिद्ध कवी शंकर वाडेवाले यांचे अध्यक्षते खाली तसेच मा.शिक्षण सचिव मा.अनिल गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन पार पडणार असून त्यात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.
साहित्य संमेलनाचा समारोप उपस्थित सर्वांच्या स्नेह भोजनाने होणार असल्याची माहिती डॉ.जतीनबोस काजळे यांनी दिली.सदर कार्यक्रमास साहित्यप्रमी,लेखक-कवी, पत्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आले आहे.