Sunday, February 22, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद, पोलीस प्रशासन सज्ज मात्र राष्ट्रीय महामार्ग अधिकारी...

जामखेड शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद, पोलीस प्रशासन सज्ज मात्र राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदाराचा वेळकाढूपणा अतिक्रमणामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासह इतर कामे ठप्प

0
2

जामखेड न्युज—–

जामखेड शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद, पोलीस प्रशासन सज्ज मात्र राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदाराचा वेळकाढूपणा

अतिक्रमणामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासह इतर कामे ठप्प

जामखेड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. बस स्थानकापासून ते शासकीय दुध संघापर्यंत दररोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. एक किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी दोन तास वाहतूक कोंडीत वाहने अडकत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्यावरील जामखेड वगळता इतर सर्व ठिकाणचे अतिक्रमणे निघालेली आहेत. जामखेड शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन सज्ज आहे पण राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार वेळकाढूपणा करत आहेत. यामुळे अतिक्रमणे कधी निघणार व शहरातील पाणीपुरवठ्यासह इतर योजना कधी कार्यान्वित होणार हाच प्रश्न जनतेला पडला आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने शहराचा विकास खुंटला आहे. तसेच उजणी धरणातून शहराला होणारी पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेत पोलीस प्रशासन, तहसील, प्रांताधिकारी यांच्या बरोबर ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी बैठक घेऊन मार्ग काढण्यासाठी धडपड आहे. तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन सर्व सहकार्य करण्यास तयार आहे पण ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी गप्प आहेत. यामुळे रस्ता कधी पुर्ण होणार, इतर योजना कधी राबविण्यात येणार, रस्ता कधी होणार असाच प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

शहरातील बस स्थानक ते खर्डा चौकातील अतिक्रमणे हटवली लवकर रस्ता सुरू झाला नाही यामुळे पुन्हा अतिक्रमणे झाली तसेच गटारावर टपऱ्या झाल्या आहेत अनेकांनी तर टपऱ्या भाड्याने दिल्या आहेत. वास्तविक पाहता गटाराच्या तीन मीटर म्हणजे दहा फूट जागा आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन राहणार आहे. बीड रोडवर तर गटारावर पक्के बांधकामे आहेत. काही अतिक्रमणे हटवली काही तशीच आहेत यामुळे फक्त टपरीधारकांवरच अन्याय होणार मोठ मोठे कामे तशीच राहणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

जामखेड नगरपरिषदेने शहराच्या विकासासाठी शहरात विविध योजना राबविण्यासाठी शहर अतिक्रमण मुक्त असावे म्हणून अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या आहेत. मात्र ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी गप्प आहेत. रस्ता सुरू नाही. कामात सतत धरसोड होत आहे.

जामखेड शेजारी आष्टी, पाटोदा, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिक्रमणे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्यावरील जामखेड वगळता सर्व अतिक्रमणे हटवली आहेत फक्त जामखेडच अपवाद आहे. तेव्हा जामखेड शहरातील काही अतिक्रमणे निघाली पण काही मोठमोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत. यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या कायमचीच झाली आहे. नेमके ठेकेदार कोणाचेच ऐकत नाही. अतिक्रमणे निघत नाहीत. याला अभय कोणाचे आहे. याचीच चर्चा सुरू आहे.

गटाराबाहेर नगरपरिषदेची दहा फूट जागा आहे पण सध्या अनेक ठिकाणी गटारावर पक्के काम करून टपऱ्या टाकल्या आहेत. आणि विशेष म्हणजे अनेक मोठ मोठ्या लोकांनी भाड्याने दिल्या आहेत. तेव्हा नगरपरिषद हे अतिक्रमण केव्हा हटवणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

अतिक्रमण हटल्याशिवाय विकास अशक्य आहे.शहरातील रस्ते नियमानुसार रोड सेंटरपासून १५-१५ मीटर म्हणजे पूर्ण ३० मीटर रुंदीचे झाले पाहिजेत.खरेदी खतानुसार जागा मोजून उर्वरित सर्व अतिक्रमण तत्काळ हटविणे अत्यावश्यक आहे.

काहींच्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे संपूर्ण जामखेड शहराचा विकास रखडला आहे.गटार, पाणीपुरवठा, रस्ते – सगळी कामे अडथळ्यात आहेत. आता प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांनीच अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन हाती घेण्याची वेळ आली आहे. रस्ते मोकळे करा… शहर वाचवा! असे सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवार यांनी सांगितले. अतिक्रमण हटविण्यासाठी लवकच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!